अर्ध्यावरती विकास पडला.. अपघाताची कहाणी ..




आज ३० डिसेम्बर. मागच्या वर्षी याच दिवशी मला अपघात झाला होता. त्याच्या वेदना आजही ताज्याच आहेत. तुम्हाला त्या अपघाताची कहाणी सांगावीशी वाटतेय. 

मी नेहमीप्रमाणे रात्री ८ वाजता घरी परतत होते.
 आमचं धुळ छोटसं असलं तरी विकासासाठी पछाडलेलं! त्याचं ते विकासाचं व्यसन तुम्हांला जागोजागी दिसेल.  आपल्या शहराला असं वाईट म्हणणं मला पटत नाही, पण तुम्ही समजू शकता, अशी व्यसनं कुणाला लागतात, नाव तर शहराचं बदनाम होतं. हे व्यसन असंय की धुळ्याला मुंबई व पुण्यासारख बनवायचंय   उड्डाणपूल, रस्त्यावर दुभाजक मोठ्मोठे होर्डिंग्स! (आमचं भाग्य हे विकासरूपी भूत बेंगलुरू, दिल्ली बघून आलं नाही, नाहीतर पाच मिनिटांच्या कामासाठी आम्हाला भुयारी रेल्वेत बसावं लागलं असतं!) स्वप्न छान आहे, पण आपण जसं असेल तसं रहाव जसं असेल तसंचं फुलाव, यात काय गैर आहे. व्यावसायिक पणे बनविलेला बगीचा सुंदर दिसतो म्हणून नाजूक रानफुलांचं महत्व आणि सौंदर्य कमी होत नाही. 

धुळ हे शहर लहान आहे. इथले रस्ते लहान आहेत, जीवन वेगळं आहे आणि आवश्यकता पण! अशा स्थितीत हे विकासाचं वेड कसं जीवघेण ठरू शकत याची ही कहाणी.
 इथे अस झालंय 
"रस्ते थोडे आणि दुभाजकच फार! "




तर........ पुन्हा कथेकडे वळू. ती एक वादळी रात्र होती. लगेच संधी साधून विजेने लपंडाव खेळायला सुरुवात केली. पथदिवे अर्थातच बंद! रस्त्यावर काळाकुट्ट! अंधार काळा रंग फिक्कट वाटावा इतका! खरं म्हणजे इथे राहूनही मला माहित नाही, पथदिवे नक्की कधी चालू असतात आणि कधी बंद! त्यामुळे आंम्हाला या अंधाराच काही नवीन नाही. तरीही मी भीत भीतच गाडी (दुचाकी) चालवत होते. अंधारात काही समजत नव्हत (गाडीचा दिवा असून नसल्यासारखा.) म्हणून एका कडेने 'डाव्या बाजूने' !

आणि अचानक मला समोर एक छोटासा क्रूर राक्षस प्रकट झालेला दिसला,त्याचा आकार एका छोट्याशा टेकडीसारखा होता, बुटका राक्षस! शरीर अंधारापेक्षा काळ! त्याची त्वचा पण विचित्रच. तो राक्षस म्हणजे विकासाचा हस्तक होता. तिथे रस्त्याचे चौपदरीकरण सुरु होते. (कुठलेही सूचनाफलक, "काम चालू रस्ता बंद " किंवा "डेंजर" वगैरे काहीच नाही कमीत कमी "तुमचे काम बंद करण्यासाठी रस्ता बंद" असं तरी लिहायचं ना! काहीही नाही.) बर चौपदरीकरण म्हणजे साडीचा पदर घेतात तसं काही असत का, हवा तसा मोठा करायचा वगैरे! मराठी फारच कठीण आहे.

चौपदरीकरण करायला रस्त्याच्या कडेला जागाच नव्हती. म्हणून खडी रस्त्यावर टाकली होती. अरे! तो बुटका राक्षस म्हणजे खडी होती.....दिवसा ढवळ्या पण तो राक्षस नीट दिसत नव्हता रात्रीचं काय! ( दुसऱ्या दिवशी उजेडात पाहिलं.)

"विकास नको पण खडी आवर!" 

काही समजायच्या आत गाडी खडीच्या टेकडीवरून खाली! मी जमिनीवर!  माझ्या अंगावर गाडी चालू अवस्थेत! आणि माझे पाय गाडीखाली अटक्लेले! 

मदतीसाठी ओरडायचा प्रयत्न केला, आवाजपण निघेना! कसं तरी मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला, रस्त्यावर एखाद दुसरी दुचाकी जाताना दिसत होती. कुणीच आलं नाही. हताश होऊन तोंडातून निघालं, "आई!", "आई!" आईला बाळाची हाक लगेच ऐकू जाते, ती धावून आली. आई म्हणजे परमेश्वर! 

अचानक लोक आले, गर्दी झाली, लोकांनी पटकन गाडी उचलली. मी कशीतरी उठले. नाकाखालून रक्त! कसंतरी त्यांना "Thanks"  म्हणून. पुन्हा गाडी चालू केली आणि घराकडे निघाले (गाडीचे Handel वाकडे झालेले होते.) कशीतरी येऊन पोहोचले घरी.

घरी आल्यावर दिसलं, पाय खाडीवरून गाडीच्या वेगाबरोबर घासला गेलाय. ही बारीक खडी होती. भयंकर व्रण! 

पुढचं सगळं नेहमीचंच... प्राथमिक उपचार वगैरे! 

दुसऱ्या दिवशी वेदना शिगेला पोहोचल्या. मला सहनच होत नव्हतं, एकीकडे भयंकर यातना आणि एकीकडे संताप, त्या अर्धवट विकासाचा.......! अशा वेळा एक गाणं हृदयातून उठलं.........

गाणं प्रसिद्ध आहे......आपल्या ओठांवर आहे,

"भातुकलीच्या खेळामधली....... "   त्यावरच हे गाणं.....पहिलं कडवं मागच्या वर्षी त्या भयंकर यातनांमध्ये आणि संतापात उठलेलं, बाकीचं आत्ताच ........  



भातुकलीच्या खेळामधले 
विकास आणिक रस्ते 
अर्ध्यावरती विकास पडला 
मरण झाले सस्ते...|| धृ  ||

'विकास' वदला मला न समजे 
अपघाताची भाषा 
माझ्या नशिबासवे बोलती 
जनतेहातच्या  रेषा 
त्या जनतेच्या डोळा तेव्हा 
दाटुनी आले पाणी 
अर्ध्यावरती विकास पडला 
अपघाताची कहाणी.. || १ ||

जनता वदली बघत एकटक 
अर्धवट तो रस्ता 
उद्या पहाटे दुसऱ्या वाटा 
तोंड पुन्हा अपघाता 
पण विकासा कधी नं कळली 
गुढ विकल ही वाणी 
अर्ध्यावरती विकास पडला 
अपघाताची कहाणी ...|| २ ||

 तिला विचारी 'विकास' का तू 
अपघातास भ्यावे 
का नं प्रजेचे जीवन आम्ही 
फुलण्याआधी तोडावे?
या प्रश्नाला उत्तर नव्हते 
जनता केविलवाणी... 
अर्ध्यावरती विकास पडला 
अपघाताची कहाणी ... || ३ || 

त्या 'राजा' ने मिटले डोळे 
दूर दूर जाताना 
त्या प्रजेचा श्वास कोंडला 
गीत 'त्या'चे गाताना 
देशावरती पसरून गेली 
एक भ्रष्ट विराणी 
अर्ध्यावरती विकास पडला 

अपघाताची कहाणी ... || ४ ||

मूळ गाण्याचे शब्द इथे  आहेत आणि पूर्ण गाणं इथे सुरु आहे. गाणं आणि बोल उपलब्ध करून दिल्याबद्दल या संकेतस्थळांना धन्यवाद! आणि सुंदर छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्या छायाचित्रकारांना आणि संकेतस्थलांनाही धन्यवाद खूप खूप!

या अपघातामुळे मला चार महिने नुसती विश्रांती घ्यावी लागली आणि MBA  किंवा  M.Tech ला प्रवेश घेता आला नाही. डोळ्यासमोर असलेलं स्वप्न, इतकं सहज दूर गेलं. शेवटी एकच म्हणावास वाटतंय ...

"विकासाचा खेळ होतो, पण जनतेचा जीव जातो."