सोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची? देवाची की स्वतःचीच!

सोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे.
या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये. 



सोवळ्याला धार्मिक आधार काय?

सोवळे पाळणे आणि त्याच्या अनुषंगाने असणारे विश्वास हा वैयक्तिक विषय आहे असा तर्क दिला जातो. तो पूर्णत: चुकीचा नाही. पण सोवळ्याबद्दल मुख्य प्रश्न उपस्थित होतो  की आपल्या सोवळ्याच्या कल्पना इतरांनीही का मानाव्या? आपल्या धार्मिक कार्याच्या पूर्तीसाठी त्या आपण म्हणू तशाच पाळाव्या अशी सक्ती आपण इतरांवर करू शकत नाही, तशी अपेक्षाही करणे बरोबर नाही. आणि ते व्यवहारात शक्यही नाही कारण सोवळ्याचे नियम कुटुंबागणिक भिन्न असू शकतात नव्हे ते तसे असतात.

खरे तर हिंदू संस्कृतीचा पायाच श्रद्धेचे स्वातंत्र्य आहे त्यामुळे एका घरातही सोवळ्याच्या कल्पना कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर कुणी एकाने लादणे संस्कृतीच्या विपरीत ठरेल. मग समाजात त्या लादणे तर योग्य नाहीच.

मुळात सोवळे ही कल्पना कुठून आली व त्याला आधार काय? 

वैदिक आचारांनंतर, व्रतवैकल्ये करणे हा भाग पुराणांतील वाटतो. तरीही सोवळे आणि विटाळ ही कल्पना अगदीच अर्वाचीन असावी असे वाटते.

व्रतवैकल्यांच्या कहाण्या वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचे सार भोळी भक्ती आणि यथाशक्ती पूजा असेच दिसते. षोडशोपचार पूजा सगळ्यांनाच शक्य न झाल्यासही काही दोष न मानता भक्तिभावाने अर्पण केलेले पदार्थ पूजा  ईश्वर स्वीकारतो असे या कथांचे तात्पर्य दिसून येते.

यात सोवळे-ओवळे कुठे आले? धार्मिक परंपरेने चालत आलेले नियम घराघरांत वेगवेगळे असतात. ते पाळणे हा आपल्या अस्तित्वाचा भाग आपण मानतो. सोवळे ही वैयक्तिक मान्यता आहे, त्यामुळे ते वैयक्तिकच ठेवणे सोयीचे आणि सरळ नाही का?

श्राद्ध हा श्रद्धेचा विषय आहे. आपण श्रद्धेपोटी आपल्या पूर्वजांसाठी जे करणार आहोत त्यासाठी पाळावयाचे नियमही आपण आपल्यापुरतेच ठेऊ शकतो. ते तसेच इतसांनीही आपल्यासाठी पाळावेत असा आग्रह कसा ठेवावा?

ज्या गुरुजींवर धार्मिक कार्य करण्याची जबाबदारी आपण देतो त्यांच्या अर्हतांचा विचार करतो का? धार्मिक कार्यास आवश्यक आचारशुद्धी ते पाळतात की नाही हे आपल्याला कसे कळणार? कारण त्याचे नियमही गुरुजींच ठरवणार. गुरुजींना प्रश्न विचारणे स्वीकार्य सहसा होत नाही.

धार्मिक प्रश्नांचा उहापोह करून निर्णय घेणे सोपे व्हावे या हेतूने धर्मसिंधु या ग्रंथाची निर्मिती झाली. पण आता धार्मिक प्रश्नांचे निर्णय आधुनिक स्वयंघोषित संत, बाबा लोकांपासून ते अगदी गल्ली गल्लीतील गुरुजी व ज्योतिषी देताना दिसतात.

त्यांच्या निर्णयांचा आधार ते स्पष्ट करतातच असे नाही. सध्या धर्माला मार्केट चांगले आहे, त्यामुळे आपले ग्राहक टिकून राहावे व पुनःपुन्हा आपल्याकडेच येत राहावे याचा विचार करून बहुतेक धर्मगुरू वा गुरुजी निर्णय/उपाय देतात. या धार्मिक व्यवसायात आपल्यावर विश्वास असणाऱ्यांची बुद्धी स्वतःच्या विवेकाने  निर्णय घेणारी झाली तर आपले व्यावसायिक नुकसानच हा दृष्टिकोन सतत डोळ्यासमोर.

आपल्या मनांत व्यावसायिक धार्मिकांनी भीती इतकी घट्ट रुजवली आहे की आता साध्या दैनिक व्यवहारांसाठी ही आपल्याला कुणीतरी बाबा, गुरुजी यांच्याकडून निर्णय घेणे अपरिहार्य वाटते. काही चुकले तर काय होईल? देवाचा किंवा बाबाचा कोप? आपलं काहीतरी वाईट होईल अशा विचारांचा स्रोत धर्म नाही, श्रद्धा नाही, तर मानवी मनातील भीती आहे आणि तिला व्यवस्थित खतपाणी घालून वाढवणारे व्यवसायिक धर्माचे ठेकेदार आहेत.

सोवळ्याला स्वच्छतेचा आधार काय?

दुसरा तर्क दिला जातो स्वच्छतेचा. सोवळं हे स्वच्छतेचं अंग आहे असं मानतात. त्याला वैज्ञानिक आधारही सांगितला जातो. पण आपण खरेच असे मानतो का? कारण सोवळ्याचे नियम जवळजवळ व्यक्तिपरत्वे बदलतात.

स्वच्छतेचे सार्वजनीन नियम सांगता येतील याउलट सोवळ्याबद्दल एकमत होणे अगदी अशक्य म्हणता येईल.

मी बरेचदा हे ऐकले आहे की आमच्याकडे अमुक चालतं, तमुक नाही. हे कसे? हे नियम कोणी बनवले? यांचा आधार काय?

याला स्वच्छता किंवा विज्ञान कसे म्हणता येईल? सुती कपड्यांना विटाळ व कृत्रिम धाग्यांच्या कपड्यांना नाही. असे अनेक नियम सांगता येतील. मासिक पाळीचा विटाळ बऱ्याच घरात कुटुंबियांच्या मते अगदी कडक पाळला (कडक म्हणजे काय?) जातो आणि घराबाहेर गेल्यावर त्याचं काय होतं? सगळीकडे स्त्रिया असतात तर त्यांच्याबाबतीत विटाळाचे काय नियम मानले जातात? माहीत नसल्यास दोष नाही असाही एक सोयीस्कर नियम काही लोक मानतात. 

कारण आपण अव्यवहार्य नियम मानतो जे पाळले जाणं शक्यच नाही, त्यांची अव्यवहार्यता लपविण्यासाठी काहीतरी पळवाट नियम पण हवेतच. ही सगळी आपली स्वतःचीच आपण फसवणूक करतो. म्हणजे आपले नियम पूर्णतः खरे नाहीत.

परमेश्वर एकच आहे मग गौरी गणपतीचे, नवरात्री चे सोवळे अधिक कडक का? देवी आणि गणपती तर एकच आहेत ना, सणासाठी त्यांचे नियम बदलतात का?  

विधवा, विवाहित वा अविवाहित असण्याने सोवळ्याचे निकष कसे बदलतात?

खोटी जात लावून वंचितांसाठी असलेल्या तरतुदींचे फायदे ओरबाडणे आणि गरज म्हणून नाईलाजाने जात लपविण्याची वेळ येणे यांत फरक आहे. दोन्ही स्थितींत फसवणूक असली तरी त्याची कारणे अतिशय वेगळी आहेत आणि त्यामुळे पहिली स्थितीही अपराध ठरते तर दुसरी माणुसकीविहीन समाजव्यवस्था दाखवते.

आपण जातीची अट ठेवतो हेच कितपत योग्य आहे?

आचार व विचारशुद्धी धार्मिक कार्यात अधिक आवश्यक नसावी का?

सोवळ्यासंबंधी स्वच्छतेचा निकष किती प्रमाणात पाळला जातो हा चर्चेचा स्वतंत्र मुद्दा होऊ शकतो पण सदाचरणाच्या कुठल्याही निकषाशी दूरचाही संबंध नसलेले सोवळे पाळणे म्हणजे नक्की काय पाळणे यावर विचारमंथन व्हायला हवे.

सदाचार व सत्याचारास विवाह अथवा पती जिवन्त असण्या नसण्याने फरक पडण्याचे काही कारण नाही. धार्मिक कार्याच्या संपन्नतेसाठी मनाची स्वच्छता आणि त्यासुसंगत आचरण आवश्यक ठरवणारे नियम अधिक गरजेचे आणि व्यवहार्य ठरणार नाही का?

English:





अधिक धार्मिक पोस्ट्स: