स्त्रियांनी कार्तिक स्वामी दर्शन घ्यावे की नाही?: समज - अपसमज

आज कार्तिक पौर्णिमा आहे. कार्तिक स्वामी दर्शनाबद्दल एक मुख्य समज लहानपणापासून ऐकत आलेय – महिलांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ नये. दर्शन घेतले तर ‘काहीतरी’ विपरीत होणार कारण कार्तिक स्वामिंचाच तसा शाप आहे असे मानले जाते. विपरीत म्हणजे काय ते आता माझ्या लक्षात नाही. बरेचसे लोक हा समज खरा मानतात. यामागे काय कारण आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न...


मी अलीकडेच अय्यप्पा मंदिरात गेले होते, तेथे कार्तिक स्वामी मंदिर पण आहे. मंदिर मुख्यत: मल्याळी बांधवांनी बांधलेले आहे. मंदिर केवळ शनिवारीच सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ दर्शनासाठी उघडे असते. शनिवारची संध्याकाळ होती, सगळे भक्त जमले होते. सर्व भक्तांनी दर्शन घेतले, कार्तिक स्वामींचे पण दर्शन झाले. महिला भाविकांनी सुंदर मंत्रमुग्ध करणारी मल्याळी भजने म्हटली. महिलांनी दर्शन घ्यावे की नाही हे कुणाच्या गावीही नाही. मग कळले, हा समज आणि ही कथा महाराष्ट्रात विशेषतः प्रचलित असावी.


व्रतांच्या कथा, पूजा व विधी हे पुराणांत सापडतात. पुराणे आता अगदी मूळ स्वरूपात आहेत की नाही याबद्दल ठामपणे सांगणे कठीण आहे. पण ज्ञान आणि भक्ती यांनी ओतप्रोत भरलेल्या कथांमध्ये मध्येच कुठे भेसळ असली तर सहसा लक्षात येतेच. आपण ऐकत आलेल्या कथेचा आधार शोधण्यासाठी मी रुद्रसंहिता बघितली. वेगवेगळ्या प्रकाशनांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांत सुद्धा पाठभेद असतात. त्यातून उत्तर भारतीय प्रकाशने, दक्षिण भारतीय प्रकाशने, महाराष्ट्रातील प्रकाशने यांच्या ग्रंथांत भेद असतो.  मी गीताप्रेसच्या पुस्तकाचा आणि भाषांतराचा संदर्भ येथे देत आहे.


मला तरी कार्तिक स्वामींनी स्त्रियांना दिलेल्या शापाची कुठलीही गोष्ट सापडली नाही. विवाहाच्या विषयावर कार्तिक स्वामीना राग आला आणि ते क्रौंच पर्वतावर तपस्येला निघून गेले अशी कथा सापडते. पण आपला राग त्यांनी कुणालाही शाप देऊन व्यक्त केला नाही. पौर्णिमेला माता पार्वती त्यांना भेटायला जाते. अशी कथा रुद्रसंहितेच्या कुमारखंडात वाचायला मिळते.


आपण ऐकत आलेली कथा श्रीधर कवी विरचित शिवलीलामृतात आहे. श्रीधर कवींचा हा ग्रंथ अनुपम आहे, दिव्य आहे. पण कार्तिक स्वामींच्या शापाबद्दलची कथा सत्य मानून आपण भयभीत व्हावे का असा मला प्रश्न पडतो. विविध भाषांमधल्या काव्यांवर कुठेतरी ज्या काळात ते रचले गेले आहे त्याचा प्रभाव जाणवतो. श्रीधर कवींचे काव्य पुराणांतील कथांवर आधारित दिसते. पुराणकथा श्रीधर कवींनी आपल्या काव्याने फुलवल्या, विस्तारीत केल्या, शब्दसौंदर्याच्या अलंकारांनी – दागिन्यांनी सजवल्या आहेत. पण कार्तिक स्वामींच्या शापाबद्दलची कथा सत्य मानून आपण भयभीत व्हावे का असा मला प्रश्न पडतो.   


दुसऱ्या एका दृष्टीकोनातून विचार करायचा तर मुळात भक्ती ही साधना आहे. परमेश्वराच्या ज्या रूपात त्याची पूजा करणे, त्याच्यावर प्रेम करणे आवडते त्यात आपण ती करावी असे स्वातंत्र्य भक्तीयोगात आहे. परमेश्वर आपल्या भक्ताचे अनिष्ट करूच शकत नाही. साधना पथावर वाटचाल करताना आपले मन भीतीयुक्त असेल तर भक्तीमध्ये कुठेतरी अविश्वास पण असेलच. परंपरा म्हणून आपण जे विश्वास अगदी कवटाळून बसतो त्याचा भौतिक सुखाच्या दृष्टीने आणि आध्यात्मिक साधनेच्या दृष्टीने काही सकारात्मक उपयोग होतो आहे का याचा विचार करणे आवश्यक आहे. शास्त्र शास्त्र म्हणून खूप निर्णय ऐकायला मिळतात पण शास्त्र म्हणजे नक्की काय, त्याला आधार काय असा उल्लेख बरेच लोक करीत नाहीत. धावपळीच्या जीवनात काय खरे काय अपसमज यांवर विचार करायला वेळ मिळत नाही. मग आपण सहसा ज्या व्यक्तीला तज्ञ मानतो त्यांचे मत ग्राह्य धरून आपली अनंत धावपळ सुरु ठेवतो.


पण काय चालतं आणि काय नाही, यांमुळे मनावर ओझं वाढत जातं आणि ते आपल्या साधनेत अडथळा बनतं. परंपरा आयुष्य अधिकाधिक सुकर होण्यास्तव तयार होत असतात पण मी अमुक केलं तर माझं काही वाईट होईल का ही भीती आयुष्य विचित्र करते. सतत सवय असल्यामुळे हा ताण आपल्याला बऱ्याचदा जाणवत नाही पण तो त्रासदायक असतोच.महिलांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे की न घ्यावे याचा निर्णय तर ज्याचा त्यानेच करायचा आहे. मी फक्त माझे विचार मांडले आहेत.  

आध्यात्मिक विचारमंथन: