अपेक्षांचे ३ पैलू जे तुमचं आयुष्य बदलू शकतील!

'अपेक्षा' या विषयावर विचारमंथन, अपेक्षांचे वेगवेगळे पैलू आणि अपेक्षा अस्पष्ट असल्या तर आयुष्यात ताण कसे वाढू शकतात, याबद्दल हा लेख आहे. या लेखातल्या तीन पैलूंवर विचार करून अपेक्षा निश्चित केल्यास मला खात्री आहे की आयुष्याची दिशा नक्कीच बदलू शकेल. 

आपल्या अपेक्षा काय आहेत, कुणाकडून आहेत याबाबतीत आपण बऱ्याच प्रमाणात आणि बऱ्याचदा अस्पष्ट असतो. मग अपेक्षा ह्या नात्यांकडून असोत वा नेत्यांकडून किंवा स्वत:कडून! अपेक्षा अस्पष्ट असल्यामुळे त्या पूर्ण होणं वा न होणं याबद्दल फारसा विचारच केला जात नाही. आणि मग आपले ताण कशामुळे वाढत आहेत किंवा आपल्याला निराश का वाटतंय हे नीटस कळत नाही. 

आपल्या समस्येचं खोलवर रुजलेलं कारण सापडतंच नाही. मग कुणावर तरी राग निघतो. काही वेळा राग स्वत:वर निघतो. दोन्ही गोष्टींनी परिस्थितीवर मार्ग निघण्याऐवजी ती चिघळतंच जाते. आपल्याला हेच कळत नाही की माझं नेमकं कुठे चुकतंय. 

आपण सगळ्यांना प्रसन्न करू शकत नाही, सगळ्यांना सुखी करू शकत नाही आणि आपल्या स्वत:च्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. थोडक्यात आपल्याला जो सगळ्यात आदर्श मार्ग वाटतो तो तसा कुठे सापडतंच नाही. 

आपण अपेक्षांचे परत परत मुल्यांकन केले, नव्याने त्या ठरवल्या तर किंवा बदलल्या तर आपल्याला जे ध्येय कल्पनेपलीकडचं वाटतेय ते अगदी आवाक्यातलं वाटू शकतं

बघू यात, आपण काय काय करू शकतो ते!    


१. स्वत:बद्दल अपेक्षा:


आपल्या स्वत:बद्दलच्या आपल्या अपेक्षा अस्पष्ट असतात. त्यामुळे आपल्याला नक्की काय करायचंय आणि काय करायचं नाही, याबद्दल फारसा ठाम निर्णय नसतो. बऱ्याचदा ज्या अपेक्षा आपण आपल्या मानतो, त्या कुणीतरी लादलेल्या असतात, म्हणजेच इतरांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा असतात. आणि त्यावर आपला विचार झालेला नसतो. 

म्हणजे आपल्याला पण स्वत:साठी तेच हवंय का जे आपल्या आसपासच्या लोकांना हवंय, उदाहरणार्थ करिअर, शिक्षण किंवा नोकरी, व्यवसाय! आपल्याला कुठल्या क्षेत्रात जायचंय आणि काय बनायचंय! तिथे जाण्यासाठीचा आपला मार्ग काय आहे आणि ध्येय गाठण्याचा कालावधी काय आहे, याचा विचार निश्चित असायला हवा.     

प्रेम, विवाह, मुलं वगैरे सगळ्या विषयांवर आपली मतं बाह्य प्रभावांवर अवलंबून असतात. मित्रांच्या प्रभावावर, नेत्यांच्या आयुष्यावर, किंवा चित्रपट वगैरेंवर बेतलेली मतं, पुस्तकांमधून वाचलेले विचार, अनाहूत सल्ले किंवा विचारून मिळालेले सल्ले अशा अनेक गोष्टींमुळे मतं बनत जातात. शाळा किंवा महाविद्यालयात तर मित्र मैत्रिणींचा प्रभाव खूप असतोच. 

आपली तयार झालेली मतं हे आपलं व्यक्तिमत्व नसतं, आपण काय आणि कसं आयुष्य जगतो त्यावर आपलं व्यक्तीमत्व ठरतं. अनेक मतांचा गोंधळ मात्र अपेक्षा असू शकत नाहीत. आपल्या स्वत:बद्दलच्या अपेक्षा जाणण्यासाठी आपल्याला वेळ द्यायला पाहिजे. मतं फिल्टर केली पाहिजे आणि आपल्याला नक्की काय हवंय हे ठरवलं पाहिजे. 

स्वत:कडून असलेल्या अपेक्षांवर आपले आईवडील, भावंडं आणि परिवार यांबरोबरच आपण एखाद्या संगठनेशी जोडलेले असू तर त्यांच्या अपेक्षांचा पण परिणाम होतो. यांत एक धोका असतो, सांस्कृतिक, जातीआधारित, धार्मिक, आध्यात्मिक संगठनांची त्यांची स्वत:ची लक्ष्य असतात. त्यात आपलं योगदान किती प्रमाणात असू शकतं, यांवर त्यांच्या आपल्याकडून अपेक्षा ठरवल्या जातात. आणि आपणही तेच आपल्यासाठी ध्येय ठरवतो. यांत काही गैर नाही. 

पण आपण आपल्या वैयक्तिक आयुष्याचा किती त्याग त्यात करतोय, किंवा आपण वैयक्तिक जीवनात आपली ध्येय गाठण्यात मागे तर पडत नाही ना, याचाही विचार आपणच करायला हवा. आपली कर्तव्य अपूर्ण तर राहत नाही ना, याचाही विचार तरुण वयातच करायला हवा नाहीतर उतारवयात दु:खं आणि नैराश्य होऊ शकतं. 

याशिवाय, दुसरा मुद्दा म्हणजे संगठन जर चुकीच्या दिशेने जात असेल किंवा आपली मतं बदलली किंवा आपल्याला काही विचार आणि कार्यक्रम चुकीचे वाटले आणि ते आपण विरोध करूनही बदलेले नाही, तर आपण त्या संगठनेपासून किंवा सामाजिक कार्यापासून दूर व्हायला हवे. कारण निष्ठेच्या बांधिलकीमुळे आपण सगळं रेटत जातो पण त्याचा ताण वाढतो आणि नैराश्य येऊ शकतं. 

आपली तत्वनिष्ठा आणि भावनिक प्रेम यांमुळे आपल्याला वाटतंय त्यावर ठाम राहाणं फार कठीण जातं. अशावेळी तत्व महत्वाचं की संगठन, हा विचार करणं आवश्यक ठरतं. आपण मुळात एखाद्या कार्याला स्वत:ला समर्पित करतो तेच तत्व प्रेमापोटी! तेच जर पूर्ण होत नसेल तर अशा ठिकाणी स्वत:ला बांधून घेण्याचे काय प्रयोजन? 

आपण स्वत:च्या तत्वाशी आणि ध्येयाशी ठाम नं राहिल्यास आतल्या आत खेद करण्याशिवाय हाती काही नाही, असं आपल्याला वाटू लागतं.     

#ध्येयापासून भरकटण्याचे अनेक प्रसंग येतात, पण आपण आपल्या स्वत:कडून असलेल्या अपेक्षा निर्धारित केलेल्या असल्या तर पुन्हा आपल्या स्वत:च्या, आपण ठरवलेल्या, कुणीही न लादलेल्या वाटेवर परत येता येते.   


२. इतरांकडून आपल्या अपेक्षा: 

आता नात्यांचा विचार करू. आपल्या कुणाकडून काय अपेक्षा आहेत, ते आधी निश्चित ठरवले पाहिजे आणि ज्या व्यक्तीकडून अपेक्षा आहेत, त्यांना त्या नीट सांगितल्या पाहिजे. तेव्हा संवाद होतो. याशिवाय, पलीकडून पण अपेक्षापूर्ती होण्यात काही अडचणी आहेत किंवा नाहीत याचा ही संवाद व्हायला हवा. 

या एका विचाराकडे लक्षं दिलं तर खूप खूप विसंवाद, भांडणं आणि त्यामुळे निर्माण होणारे ताणतणाव कमी होऊ शकतात.

छोटी छोटी भांडणं बऱ्याचदा स्पष्ट संवाद नसल्यामुळेच होतात. 

सं की, आपण कितीतरी वेळा हे संवाद ऐकतो,


"मला वाटलं तू हे करशील!"
 "हे काय सांगायची गरज होती का? तुला समजलं कसं नाही?"
"मला वाटलं, सांगायची काय गरज आहे, तुला समजेलंच!"
"सगळ्या गोष्टी सांगाव्याच लागतील? स्वत:च्या बुद्धीने काही करता येणार नाही."


यामागे अपेक्षा ही की आपल्या मनातलं इतरांना समजावं. पण, आपण सांगितलंच नाही तर कुणाला कसं कळणार? आजकाल बहुतेक सगळ्यांच्याच मनात ताण असतात, अनेक विषयांचे विचार आणि दबाव असतात. वेळेचा अभाव असतो. मोबाईल, स्मार्ट फोन, सोशल मीडिया यांमुळे पूर्वीपेक्षा कैक पटीनी जास्त आपला जगाशी संपर्क वाढलाय. असं असल्याने आपल्या मनातलं कुणाला समजेल अशी अपेक्षा करणं बरोबर नाही. 


अपेक्षांबद्दल आपले विचार पण काहीसे सोयीस्कर असतात. म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीचे आणि नेत्याचेही अपराध आपण लपविण्याचा प्रयत्न करतो; त्यासाठी काहीतरी पळवाट शोधतो किंवा काहीतरी कारण काढतो. पण एखादी व्यक्ती नावडती असेल तर मात्र तिच्या छोट्याशा अपराधाला पण  क्षमा नाही. 

हे असं बाहेरून जरी आपण दाखवलं तरी मनातल्या मनात दु:खं तर होतंच. आणि हे ताणाचं कारण बनू शकतं. 

# स्पष्ट संवाद असण्याने गैरसमज होण्याचा प्रश्न राहत नाही. 

३. अपेक्षा नेत्यांकडून / सत्ताधाऱ्यांकडून: 

एखादा नेता आपल्याला ओळखतंही नाही, पण त्यांच्यासाठी आपण आपसात भांडत बसतो. मग मतभेद झाले तर एकमेकांची उणीदुणी काढली जातात.


  • या सगळ्याने काय फरक पडणार आहे? 
  • कुणाला फरक पडणार आहे? 
  • आपलं आयुष्य अधिक चांगलं होईल का? 
  • इतर कुणाचं आयुष्य ठीक होईल का? देशात काही खूप मोठी क्रांती वगैरे आपल्याचं माणसाला दुखावून घडून येईल का?  


आपण ज्यांच्यासाठी भांडतो, ते खरंच तेवढ्या योग्यतेचे आहेत का? 
की आपले मित्र, नाती अधिक महत्त्वाची आहेत? 

आपल्या राजकीय भावना तीव्र असल्या तर याचा विचार करायला आपल्याला वेळंच मिळत नाही.

फेसबुक आणि whatsapp वर तर राजकीय पोस्ट्स सारख्या फिरवल्या जातात. तेच तेच वाचून मन चिडतं तरी किंवा उद्विग्न तरी होतं. मुळात आपण एखाद्या राजकीय पक्षाला किंवा नेत्याला आपले समर्थन आणि भावना देतो, ते या अपेक्षे ने की ते आपले प्रश्न सोडवतील, राष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील. 

पण, मग अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही याचा विचार करण्यापेक्षा आपला आवडता नेता आणि पक्ष आपल्यासाठी आपल्या वैयक्तिक अहंकाराचा किंवा प्रतिष्ठेचा मुद्दा होतो. राजकीय विषयांवर मतभेद आणि वादविवाद झाले तर नाती दुखावतात कधीकधी! त्याचा परिणाम आपल्या मनावरचा ताण वाढण्यात होतो.

मी हे सगळं अनुभवलंय. चर्चा करण्यात गैर काहीच नाही. पण आपला हट्टं हा का की कुणी आपल्या आवडत्या पक्षाविरुद्ध किंवा नेत्याविरुद्ध बोलूच नये. मला वाटतं, सोशल मिडियावरच्या अतिरेकी राजकीय पोस्ट्समुळे हे फार वाढलंय. खोट्या आयडीच्या सोयीने पण वितंडवाद आणि अपशब्दांचा वापर खूप वाढलाय. त्याचा खरे नाव आणि ओळख असणाऱ्या व्यक्तींना नक्कीच जास्त त्रास होतो.

काही वर्षांपूर्वी, कुणी धर्मनिरपेक्ष किंवा हिंदुत्ववादी, कॉंग्रेस समर्थक वा भाजप समर्थक किंवा अजून काहीही समर्थन विरोध करणारे असोत, त्यावरून एकमेकांकडे द्वेषाने बघणे, सतत एकमेकांची टवाळी करणे हे होत नव्हतं. आता हिंदुत्व, आप समर्थक, धर्मनिरपेक्ष सगळेच शब्द अगदी अपशब्द असल्यासारखे वापरले जातात, शिवी दिल्यासारखा एकमेकांचा उल्लेख केला जातो.

हे सगळं मुळात आपण ज्या पक्षाकडून अपेक्षा करतो, तो राजकीय पक्ष त्या पूर्ण करीत आहे की नाही याकडे लक्ष देण्यापेक्षा विरोध करणाऱ्यांकडे लक्ष दिल्यामुळे होतं. आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार असायला हवा. आपणच आपल्या पक्षाला प्रश्न विचारायला हवे. पण असं का होत नाही? 

#कारण पुन्हा अपेक्षांबद्दल अस्पष्टता!


थोडक्यात: 

आपण अपेक्षा निर्धारित कराव्या आणि बदलत्या परिस्थितीत वेळोवेळी त्यांचे मूल्यांकन करून नव्याने निश्चित कराव्या. 

हा मार्ग जीवनातले बरेचसे प्रश्न निर्माण होण्याआधीच त्या दूर ठेवायला मदत करेल.