सोशल मिडियाचे व्यसन : साधनेला बाधक

फेसबुक आणि सोशल मिडियाचे अत्यधिक व्यसन आध्यात्मिक प्रगतीला बाधक ठरू शकते. सोशल मिडिया साईट्सवर अनंत विषयांवर अनंत पोस्ट्स सुरु असतात. यापैकी कितीतरी निरर्थक असतात. पण त्याकडे लक्ष वेधले जाते. १० वेगवेगळे लेख वाचणे आणि फेसबुकवरील लहान मोठ्या १० पोस्ट्स वाचणे यात खूप फरक आहे. आपल्या मनाची एकाग्रता होतच नाही. सतत नवनवीन विचारतरंग मनात उठत असतात.
साधनेमध्ये आपली अंत:शुध्दी होत असते. मनातले असंख्य तरंग निघून मन शांत होत असते. मनातील तरंगांमुळेच  तर शांती अनुभवता येत नाही. पण सोशल मिडिया किंवा नवनवीन खेळ ज्यांना आपण गेम्स म्हणतो ते अनंत संस्कार मनावर निर्माण करीत असतात. डोळ्यांवर पण ताण आणत असतात. त्या सगळ्यांचे मनावर संस्कार होत असतात. आणि हे संस्कार दूर करण्यात साधना अधिक करावी लागते किंवा साधनेतील प्रगती मंद होत जाते. आध्यात्मिक अनुभवांपासून मन दूर होत जाते.

आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा आपल्या जीवनातील ध्येयप्राप्तीसाठी मन शांत असणे अत्यंत आवश्यक आहे. शांत मनाकडून योग्य निर्णय घेतले जातात. शांत मनाकडून अधिकाधिक काम होते. कामाचा वेळही वाचतो, त्यामुळे उरलेला वेळ नवीन काही शिकण्यात किंवा साधनेत घालवणे शक्य होते.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे नवनवीन विश्वे निर्माण होत आहेत. परग्रहावर जीवसृष्टी आहे की नाही माहीत नाही. पण आपल्याच पृथ्वीवर सोशल मिडिया साईट्स, ब्लॉग्स या सगळ्यांमुळे नवनवीन सृष्टी निर्माण होत आहेत. आणि अगदी याच प्रकाराने आपल्या मनातले तरंगपण खूप वाढत जात आहेत. त्यामुळे अशांती आणि मनावरचा ताण वाढतो.

कर्म हे कायिक, वाचिक आणि मानसिक असते. सोशल मिडिया व्यसनामुळे आपली वाचिक आणि मानसिक कर्म हजारो - लाखो पटींनी वाढली आहेत. अनासक्त कर्म मुक्ती देते. पण आसक्तीयुक्त कर्म  नवीन कर्मबंधने निर्माण करते. सोशल मिडिया व्यसनामुळे तेच होत आहे. कर्म आणि कर्मबंधन वाढत आहे. कर्म खूप सार्थ आहे असे नाही. सोशल मिडिया ज्ञानाचा महास्रोत आहे, याबद्दल दुमत नाही. पण ते व्यसन लावणारे आहे आणि हे व्यसन अध्यात्माला हानिकारक आहे.

त्यामुळे सोशल मिडीयावर वावरतांना, आपल्याला काय आणि किती बघायचे आहे, याचा मनात निश्चय ठेवा. मित्रांशी सुसंवाद, गप्पा हे सगळे आवश्यक आहे आणि सोशल मिडियामुळे तर जगभरातून विचारांचे आदानप्रदान होत आहे, पण हे सगळे अमर्याद होऊ देऊ नका.

आपले भौतिक ध्येय साधणे आणि आध्यात्मिक ध्येय साधणे, दोन्हीही तपस्याच आहेत, साधनाच आहेत. त्यापासून विचलीत करणाऱ्या साधनांपासून दूर राहा.  

विचारयज्ञात अन्य प्रेरणास्पद लेख व कविता: