कविता: प्रेम म्हणजे...

प्रेम म्हणजे काय असतं अशी व्याख्या करण कठीणंच. आणि ती करण्याचा प्रयत्न केला तर ती कविताच होते.


प्रतिमा: केशरी गुलाब


प्रेम म्हणजे कळीचं फुलणं
प्रेम म्हणजे फुलाचं उमलणं

प्रेम म्हणजे फुलपाखराचं
परागासाठी वेडं होऊन भिरभिरणं

प्रेम म्हणजे प्रसन्न पहाट होणं
प्रेम म्हणजे चिमणीचं गोड चिवचिवणं

प्रेम हसता हसता रडवणारं
आणि
रडता रडता हसवणारंही

प्रेम गालावरच्या गोड खळीसारखं
खुदकन हसणारं

प्रेम म्हणजे स्वप्नांनाही
गोड गुलाबी स्वप्न दाखविणारं

प्रेम म्हणजे रिमझिम पाउस
प्रेम म्हणजे कोवळं निरागस ऊन
आणि प्रेम म्हणजे ऊन-पावसाचं इंद्रधनुष्य

प्रेम म्हणजे हळुवार संगीत
एका हृदयाचं दुसऱ्या हृदयाला कळणारं

प्रेम म्हणजे हळुवार फुंकर
रडणाऱ्या मनाला सावरणारं

प्रेम म्हणजे वाऱ्याची झुळूक
अलगद हृदयाला स्पर्शिणारं

प्रेम म्हणजे नुसता वेडेपणा
वेडं होऊन जीवन जगण्याचा शहाणपणा

प्रेम म्हणजे गोड स्मित
गालातल्या गालात नकळत उमटणारं

प्रेम म्हणजे आठवण
आयुष्याला व्यापून उरणारी एक साठवण

प्रेम म्हणजे अश्रू
उगाचंच ओघळणारे गालांवरून

प्रेम म्हणजे अवखळ भीती
स्वत:ला  प्रेमात विसरण्याची

आणि प्रेम म्हणजे अथांग शांती
हृदयातलं स्मित डोळ्यांनी सांगणारी

प्रेम म्हणजे कविता
शब्दाशब्दांतून वाहणारी
आणि शब्दांवाचूनही सहजच मनात तरळणारी

विचारयज्ञ मध्ये अन्य कविता: