विचारयज्ञाचा आरम्भ

|| श्री श्री गुरवे नम:||

परम पूज्य सद्गुरुमाऊलि नारायणकाका ढेकणे महाराजांच्या परम पावन आणि विश्वास पावन करणाऱ्या चरणकमली कोटी कोटी साष्टांग प्रणाम! सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

परवा म्हणजे धनत्रयोदशीला हा मराठी ब्लॉग सुरु झाला. झाला म्हणजे मी केला असं म्हणणं चुकीचा ठरेल, कारण जे होतं ते ईश ईछेनेच! सद्गुरूंच्या ईछेनेच! या ब्लॉगवर हृदयातून प्रस्फुटीत झालेले विचार असतील.प. पू. सद्गुरुदेवांनी जवळजवळ दीड वर्षापूर्वीच मला स्फुरलेले लेखन बघून आशीर्वादात्मक आज्ञा दिली होती की तुम्हाला जो आनंद मिळालाय तो इतरानांही द्या. पुन्हा पुन्हा हे लेखन छापायला ही सांगितले.

या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर विचारयज्ञ ह्या ब्लॉगची सुरुवात होत आहे. माझ्या मनातल्या शंका कुशंका नष्ट होऊन आता हे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी हा 'विचारयज्ञ'  सुरु होत आहे.

यज्ञ सकाम, निष्काम असू शकतो. स्व-कामानापूर्तीसाठी किंवा वैश्विक शांती व भरभराटीसाठी असू शकतो.यज्ञात दिल्या जाणाऱ्या आहुती ह्या शुद्ध तुपाच्या पवित्र आहुती असतात. या आहुती नष्ट होत नाही तर पवित्र धुराच्या रूपाने विश्वात पसरतात व योग्य तो अपेक्षित परिणाम साधतात किंवा घडवून आणतात.

तद्वतच हे आपोआप स्फुरलेले विचार नवीन मंथन विश्वात घडवून आणतील. याशिवाय परम प्रेम अर्थात प्रेमभक्ती, निष्ठा, सत्य, तत्वज्ञान यांची वर्षाही करतील व जसे गुरुकृपेने हे हृदय उमलून उठले, तशी हे विचार वाचून सर्वांचीच हृदये उमलावी आणि आनंदाने मोहरून जावी हीच सद्गुरुदेव नारायणकाकांच्या चरणकमली प्रार्थना!

Comments