सिद्धयोग ( महायोग )
कष्टाचा हा मार्ग नसे, आनंदाचा झराच असे |
आपोआप हा वाहणारा, शक्तीचा स्रोत असे || १ ||
शक्ती वसे अंतरी जी, जागृत होई गुरुकृपेने |
सुप्त असता गुप्त भासे, गुरुकृपेने प्रकट दिसे || २ ||
प्राणाधार कुंडलिनी, माता जी जगती वसे |
अंतरी ती आपुल्या वसे, गुरुकृपेने प्रकट दिसे || ३ ||
प्रकट होता तांडव करुनी, कर्माचे डोंगर नाशी |
क्षणात ती भस्म करी, पापांच्या महाराशी || ४ ||
मार्ग हा न इथेच थांबे, शुभकर्मेही जाळत राही |
उरता उरे प्राण केवळ, अद्भुत हा प्रलय जवळ || ५ ||
केवळ दिसे गुरुकृपेने,गुरुकृपेने गुरुकृपे ने ||
झरा हा सहजी जवळ, तृप्त त्याने व्हावे केवळ || ६ ||
सिद्ध हा योग हा, गुरुकृपेचा महायोग हा ||
सद्गुरू कृपेचा दिव्य योग हा || ७ ||
महायोग हा सहजी मिळाला ||
आत्मानंद हृदयी गवसला || ८ ||
जिंकू नका विकारांना, प्राण जिंके सहजी त्यांना ||
मारू नका विचारांना, प्राण घेई सहजी त्यांना || ९ ||
काम सोपे करणे न काही, गुरुकृपेचा अनुभव घेई ||
दु:खाने का रडत राहता, सुखाने का भ्रमत राहता || १० ||
संग घ्या प्राणाचा, अवचित गोड नामाचा |
बघा कुठे तो भ्रम आहे, आनंदची भरला आहे || ११ ||
अखंड संवाद सद्गुरूंशी, मिलाप होई अखंड त्यांशी ||
हवे अजुनी काय तुम्हाला, विचार करुनी सांगा जरा || १२ ||
अद्वैत झरा प्रस्फुटीत होई, कार्य सोपे साधुनी घेई ||
आनंदाचा अनुभव घेई, आनंद आनंद हृदयी घेई || १३ ||
आनंद आनंद, हृदयाचे स्पंदन आनंद ||
आनंद आनंद केवळ आनंद ||
जगती भरला आज आनंद || १४ ||
स्तोत्र हे पठण करता, साधनेत गती येई |
विघ्नांचे साऱ्या निर्दालन होई || १५ ||
आशिष हे नारायणाचे, वचन सर्वां सद्गुरूंचे ||
सदा सदा सदा राही अमिट हे बोल माझे || १६ ||
विश्वास मनी असो द्यावा, अखंड ध्यास हृदयी मिळावा ||
जीवन कृतार्थ मग होई, अंतरी दु:ख मुळी न राही || १७ ||
एकरूपता आज गुरूंशी, अनुभविली सहज साची ||
मी न उरले माझे काही, गुरुकृपा भरुनी राही || १८ ||
विघ्न असो साधनेतील, जीवनातील वा सूक्ष्मातील |
सर्वांचे निर्दालन होईल,त्रुटी कशाची कदा न राहील || १९ ||
भाव हृदयी जरा असावा, अनुभव मग सहजी घ्यावा ||
आता तरी सुटावी चिंता, दु:ख भयाची व्यथा || २० ||
विचारांना जाऊ द्यावे, विकारांना धुवू द्यावे ||
क्रियात शक्तीच्या, काही न करावे ||
आपोआप मग जीवन चालावे, निश्चिंत सदा जीवनी असावे || २१ ||
सिद्धायोगाविषयी अधिक विस्तृत माहिती साठी कृपया सिद्धयोगाचे अधिकृत संकेत स्थळ http://www.mahayoga.org/ इथे भेट द्यावी.