Saturday, January 15, 2011

प्रेम तत्त्व तुझे नि माझे...

मकरसंक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! "तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला !" हो ! पण आपण अजूनही माझ्याशी फारसं बोलत नाही. दिवाळी च्या मुहूर्तावर हा ब्लॉग सुरु झाला आणि आज संक्रांत आहे. ही संक्रांत आपलं हे मैत्रीचं, बंधुत्वाच नातं असंच दृढ करो . आपल्या जीवनात, आपल्या कुटुंबात, आपल्या मित्रपरिवारात सगळ्यात सुंदर असे प्रेम सदा वर्षत राहो ह्या माझ्या हार्दिक शुभेच्छा!

आज काय लिहावं, म्हणून काही ठरवलंच नव्हतं..अचानक आठवलं...मला सगळ्यात आवडणारं काव्य..म्हणजे गोस्वामी तुलासिदासजी विरचित दिव्यं प्रेम आणि भक्ती यांनी ओथंबलेले महाकाव्य 'श्रीरामचरितमानस' ! हे काव्य समजले नाही तरी इतके गोड आहे की वेड लावल्याचून सोडत नाही. या काव्यातल्या  मला सगळ्यात आवडणाऱ्या ओळी....तुम्हांला सांगाव्याशा वाटल्या. या ओळी रामायणातील सगळ्यात सुंदर अशा सुंदर कांडातील आहेत....प्रसंग हनुमानजी सीताजीना प्रभू रामचंद्रांचा निरोप अशोकवाटिकेत सांगत  आहेत.....माताजी चिंतीत होत्या .....दु:खातीरेकाने मृत्यूची याचना करत होत्या .....नेमक्या त्याच वेळी ....हनुमानजी प्रकट झाले आणि त्यांनी माताजींचे सारे दु:ख दूर करणारा अमृतमय निरोप सांगितला.....त्या ह्या ओळी ..

तत्त्व प्रेम कर मम अरु तोरा |
जानत प्रिया एकु मनु मोरा ||
सो मनु सदा रहत तोहि पाहीं | 
जानु प्रीती रसु एतनेहि माहीं ||

"मुकं करोति वाचालं ..." अशा प्रभून्चीच आणि सद्गुरूंची कृपा असल्यावर काही अशक्य नाही ....एवढं दिव्यं अमृतमय महाकाव्य थोडंसुद्धा समजण, प्रभूंच्या कृपेशिवाय शक्य नाही .....त्यामुळे मी याचं भाषांतर करण्याचं दुस्साहस कधी करू शकणार नाही .....पण सहज प्रभूकृपेने जे स्फुरलं..ते आज तुम्हांला सांगावसं वाटलं..त्या या ओळी..... सिद्धयोगात  आपोआपच सगळं गुरुकृपेने होत असत..त्यामुळे हे सगळं हृदयातून जसं आलं तसं आहे ......माझी काही बुद्धी नाही आणि विचार पण नाही .

प्रेम तत्त्व तुझे नि माझे |
जाणी प्रिया एक मन माझे || 
ते मन सदा  राही तुजपाशी |
जाणी यातच प्रीतीरसासी ||

परम पूज्य सद्गुरूमाऊली नारायणकाकांच्या परम पावन व विश्वास परम पावन करणाऱ्या चरणकमली अर्पण!