विचारयज्ञ हा ज्ञानयज्ञ


||श्री श्री गुरवे नम:||

दीपावली म्हणजे विचारयज्ञाचा जन्मदिवस.  
आज विचारयज्ञाचा दुसरा वर्धापन दिन.

 दिनांक 5 नोव्हेंबर २०१२ रोजी सद्गुरूमाउली श्री नारायणकाका ढेकणे महाराजांनी इहलीला थांबवली. खरं म्हणजे हे सगळे कसे लिहावे तेच कळत नाही. विशेष म्हणजे माझे ब्लोगलेखन हे केवळ त्यांच्यामुळेच आहे. त्यामुळे अधिकच कसेतरी वाटतेय लिहिताना. मी काही नुसती श्रद्धा म्हणून हे लिहीत नाही, तर खरंच त्यांच्यामुळेच लेखन सुरु झाले आणि नंतर ब्लॉगींग ही. 

आज हा मराठी ब्लोग सुरु करून दोन वर्ष पूर्ण झालीत. श्रीगुरुमहाराजांनी उपदेश दिले असे काही म्हणताच येणार नाही, त्यांचे आदर्श जीवन आणि परम कृपा यानेच हे जीवन घडले. त्यांचे बोलणे साधेच, पण महान ज्ञान त्यात भरलेले. ते सद्गुरू आहेत आणि सद्गुरू शिष्यास कधीच सोडून जात नाही. मग दु:ख करणे तरी योग्य का? आणि त्यांनी तर विचारयज्ञच मला दिला आहे. हे सुंदर विचार जे आत्मिक शांती आणि परम प्रसन्नता देतात, ते गुरुकृपेनेच. अशा स्थितीत दुःखाचा विचारही अज्ञानच. 


"कुठे न जाणे, कुठे न येणे 
त्या अवधूताचे केवऴ 
भक्तांतच राहणे 
चैतन्य हेच रूप त्यांचे 
विविध रूपे सदा प्रकटले 
नाश ना त्या चैतन्याला 
अविनाशी तत्त्व हे सांगितले "

 आजच्या दिवशी मन असे उद्वेलीत असताना काय लिहावे. पण हा विचारयज्ञ जन्मदिन आज आपण श्रीसद्गुरूमहाराजांच्याच विचारांनी साजरा केला तर



गुरुमहाराजांनी प्राण हाच देव असे सांगितले आहे आणि प्राणसाधनाच सर्वश्रेष्ठ असे वारंवार प्रतिपादिले आहे. महायोगाच्या प्रसारासाठीच ते जगले. 
"सर्वेsपि सिद्धयोग दीक्षिता: भवन्तु " असा महानतम संकल्प त्यांचा आहे. असा संकल्प तर सर्वशक्तिमान केवळ परमेश्वरच करू शकतो. 

नियमांच्या काटेकोरपणामुळे किंवा अजून काही कारणांनी काहीजणांची दीक्षेस्तव प्रार्थना करण्याची तयारी होत नाही. म्हणून गुरुमहाराजांनी महायोगाचा पूर्वाभ्यास हा सर्वांसाठी खुला केला आहे. मन हे प्राणामुळेच आहे आणि आपल्या सर्व क्रिया, जीवन, कर्म सर्वकाही प्राणामुळेच आहे. म्हणून प्राणाची उपासना रोज काही वेळ करायची. आस्तिक - नास्तिक सर्वांनाच यामध्ये शंका घेण्याचे काही कारण नसून सगळे भेद मिटविणारी अशी ही महायोगाची (सिद्धायोगाची) साधना आहे. 

सद्गुरुमहाराज परम पूज्य श्री नारायणकाका महाराजांचा संदेश त्यांच्याच शब्दांत,


सिद्धयोग (महायोग) पूर्वाभ्यास   

।।सर्वेsपि सिद्धयोगदीक्षिता : भवन्तु ।।

सर्व आबालवृद्धांना आवाहन !

"दुर्लभं भारते जन्म!"

पूर्वजन्मातील अपूर्ण राहिलेला योगाभ्यास पूर्ण व्हावा म्हणून भारतातील प्रत्येक व्यक्तीचा जन्म झाला आहे. जीवनाच्या कृतार्थतेसाठी शक्तिपाताची (कुंडलिनी शक्तिजागरणाची) सर्वश्रेष्ठ ब्रह्मविद्या सर्व आबालवृद्धांना प्राप्त व्हावी व पूर्वजन्मातील अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून

 "एक अत्यंत सोपी बिनखर्चाची पूर्वाभ्यासाची योजना ठेवीत आहोत."

1.   शांतपणे डोळे मिटून आसनावर बसावे. 
2.   शरीर कालांतराने नष्ट होणारे आहे, परंतु आपोआप होणारा श्वासोच्छ्वास (चैतन्य) हेच आपले खरे चिरंतन स्वरूप आहे, हे ब्रह्मविद्येचे मूळ सूत्र आहे. 
3.   म्हणून शरीर अत्यंत ढिले सोडून आपोआप होणाऱ्या श्वासोच्छ्वासावर लक्ष ठेवून घडणाऱ्या क्रियांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावे, अशी स्वत:च्या चैतन्याची पूजा दररोज ३ ते १८ मिनिटे करावी.  
4.   हा पूर्वाभ्यास जात, लिंग, वर्ण, आश्रम इ. भेदांना बाजूला ठेवून अगदी दुराचाऱ्यालाही करता येईल. 
5.   हा पूर्वाभ्यास रोज केल्याने आर्थिक विवंचना, भोवतालचे दुष्ट वातावरण, व्यसनाधीनता इ. हळूहळू. नष्ट होईल. अंत:शुद्धी होऊन मन:शांतीला प्रारंभ होईल. 
6.   ह्या पूर्वाभ्यासाने सर्वश्रेष्ठ शक्तिपात दीक्षेसाठी आपोआप तयारी सुरु होईल व जीवनाच्या पूर्ण कल्याणाचा मार्ग प्रगतिपथावर राहील. 
7.   पूर्वाभ्यास नुसता वाचून उपयोग नाही, तो क्य्ल्याशिवाय प्रचिती मिळणार नाही. 

सर्वांचा कल्याणेच्छु,
(सही)
ना. य. ढेकणे.  
महायोगाचे अधिकृत संकेतस्थळ : http://mahayoga.org/ . 

श्रीसद्गुरूमहाराजांचे शब्द म्हणजे वेदच. 

दीपावली ही खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या  हृदयात ज्ञानाची ज्योत लावणारी ठरो हीच सद्गुरूचरणकमली प्रार्थना.  

आपण सर्व वाचक त्या चैतन्यशक्तिचीच विविध रूपे आहात. विचारयज्ञाचे लेखन करणे ही पूजाच आहे. ह्या पूजेत सहभागी झाल्याबद्दल आणि मला प्रोत्साहन दिल्याबद्दल आपले आभार मानणे म्हणजे एक औपचारीकता ठरेल.  त्यापेक्षा, ही पूजा अशीच सुरु राहो यास्तव सद्गुरूमहाराजांना व आपणा सर्वांना प्रार्थना. 

Comments