आयुष्यात सुख - दु:ख आणि यशापयश हे सुरूच राहतं. आपण कधी कधी काही क्षणांत गुरफटतो आणि तिथेच थांबतो. आयुष्याचा हा प्रवास सुंदर आणि सुखद अनुभव होण्यासाठी ही कविता...! मला विश्वास आहे, तुम्हांला ही कविता नक्कीच आवडेल..
आपण थांबलो तरी
कधी कधी
आयुष्यच थांबतं
आपण चालतंच राहिलो तरी!
सगळी शक्ती पणाला लावून चालतंच राहिलो तरी
वाट चुकते कधी कधी
तर कधी
लक्ष्यच ठाऊक नसतं
मग आपण म्हणतो
वाट थांबली इथे की मी?
की मीच थांबलो, हारलो?
वाट थांबली इथे की मलाच रस्ता दिसत नाही?
आणि कधी कधी तर आयुष्य म्हणतं
लक्ष्य कुठेतरी मागेच राहीलं
आपण वेड्यासारखं नुसत धावतंच राहिलो
रस्ताही खराब असतो कधी कधी
पण आपण मानायलाच तयार नसतो
खाच-खळगे थकवतात आपल्याला
पण आपण मात्र वेडे, 'इतकं चालूनही
लक्ष्य लांबच राहीलं?'
म्हणून रडत बसतो.
'का मीच अपयशी?
का माझेच लक्ष्य दूर?
का माझेच प्रयत्न कमी पडतात?
काय करू मी अजून,
या आयुष्याला एकदा सुंदर बनविण्यासाठी?'
विचारांत स्वत:ला गुरफटून घेतो
विचारांत स्वत:ला गुरफटून घेतो
आपण एक विसरतो
थांबे असतात वाटेत, प्रवासात
थांबे असतात प्रवासात, आयुष्यात
या जीवनप्रवासात!
तुमच्या - आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यांत
हारण्याचे, रडण्याचे आणि हसण्याचेही!
थांबे असतात कधी कधी
आणि थांबे घ्यावेत कधी कधी
नुसते विश्रांतीचेही ...
सुख-दु:ख कडू-गोड
शांत आणि निश्चल
सगळंच अनुभवायचं.
हे थांबे बघण्यात, अनुभवण्यातही
मजा असते
एका क्षणात धाव घेऊन
लक्ष्य मिळवायला बघतो आपण
आणि आयुष्य नुसतीच धावपट्टी करून बसतो मग
आयुष्य म्हणजे असतो एकच क्षण
तो जगायचा आणि अनुभवायचा
चालणं थांबणारंच नाही
वाट चुकली तरी चुकणार नाही...
काहीतरी नवीन गवसेल चुकलेल्या वाटेतंही
चुकलेल्या अनुभवातही ...
अनुभवलेल्या चुकांतही
चालणं आणि जगणं
जगणं आणि चालणं
हो! हेच तर आहे आयुष्य!
हाच तर आहे खरा प्रवास...
प्रवासात असते अनुभवांची शिदोरी
लक्ष्य गाठण्यासाठी
आयुष्यही तर हेच देतंय आपल्याला
अनुभवांची शिदोरी !
आणि लक्ष्य गाठणं
हाही एक थांबाच नाही का?
थोडीशी विश्रांती घेऊन
थोडा विजयाचा आनंद करून
पुन्हा पुढच्या प्रवासास निघण्यापुर्वीचा
एक सुखद थांबा...
आयुष्य चालतंच राहतं...
मग आपण का थांबावं?
आणि आयुष्य तरी का थांबवावं..
नुसतंच चालण्यासाठी...?
आयुष्य सुंदर बनवावं
हा क्षण जगून..
मैत्री करून...मैत्रीशी
स्वप्नांशी, प्रेमाशी, आशा-निराशेच्या खेळांशी
आयुष्य चालतंच राहतं..
आपण फक्त रस्ता सुंदर बनवावा..
प्रवास हा आयुष्याचा सुंदर जगावा
येणारा क्षण मनापासून जगून..
अगदी मनापासून जगून!