लय जीवनाची कुणी घडवली ....

हिवाळा  चालू आहे, दुपारचे उन सुद्धा अगदी गोड वाटते. मन अगदी शांत  होऊन जाते. शांत निळ्या सरोवरासारखे! कसलेही विचार नाही, कुणाशीही बोलायची इच्छा नाही.....अविचल शांत ...त्या शांत अवस्थेत हृदयातून उठतो एक गोड आवाज .......ईश्वराचा! मग बोल उमटतात दिव्यं. कल्पना सुचतात अतिभव्य! ज्या सर्व कल्पनांच्या पलीकडे असतात. सर्व आभासांच्या पलीकडे....एक सत्य ....सर्वात  सुंदर सत्य ...शिव!
     
लय जीवनाची कुणी घडवली 
चिंता त्यात मी उगा का घातली
संगीत हे लयबद्ध रचिले ईशाने 
भीती त्यात मी उगा का घातली 
प्रेमगीत हे जीवन तू बनविले 
भ्रम त्यात मी उगा का घातीले 
प्रेम तुझे मी का नं स्वीकारीले 
लयबद्ध श्वास हे का न तुला अर्पिले 
तू हृदयी माझ्याच होतास 
दूर तुजपासूनि का मी गेले 
दु:ख हृदयी जरी संचले 
तव चरणी ते का न अर्पिले 
खोट्या भ्रमा का मी भुलले 
प्रेमात तुझ्या का न रमले 
लय जीवनाची हाती तुझ्या 
प्राणप्रिय हे सद्गुरुराया 
तूच राम, ईश्वर तूच
जगती भरला परमेश्वर तूच 
भक्ती दिव्यं हीच लय जीवनाची
भेट दिली मज 'श्रीरामाची' 
का न कळे हे भाव दिव्यं 
जीवन बनविले तू महाकाव्य  
   
आयुष्याच्या  वाटचालीत कधी कधी चुकून जरा वेगळ्या जागी अचानक पोहोचतो, मग बऱ्याचदा आपली लय बिघडते, काय करावं  ते कळत नाही किंवा कदाचित अंधाराने किंवा अशाच ना कळणाऱ्या कारणांनी आपली नेहमीची वाट अगदी समोर असूनही दिसत नाही. कधी तर पोपटासारख आपणच नको ते पकडून बसतो.

काय झाल कळत नाही, पण लिहिण्यातली लय बिघडली, काही करता पूर्वीसारखी होत नव्हती. लिहिताना मनाचे समाधान होत नव्हते. लेखन ही चैतन्यापुजा किंवा विचारयज्ञ नं राहता उगीच एक ब्लॉग चालवायचं काम असं होतंय की काय असं वाटत होतं.

 तेव्हापासून मला फार वाईट वाटलं, मी खरच कुठेतरी चुकले का, कारण एक लेख खरच मनापासून वाटला नाही मलापण! पण कारण तेच लय बिघडली. पण तेव्हापासून ठरवल, थोडा उशीर झाला तरी चालेल, पण पूर्ण समाधान होईपर्यंत लेख प्रसिद्ध करायचा नाही.

अशा वेळा जरा थांबणंच ठीक! अंधार वाटत असेल तर उगीच चाचपडत वाट चुकण्यापेक्षा, धीर धरून सूर्योदयाची वाट बघावी. खरं सांगू , हे सगळं मी लिहीत नसून नुसतं अंतर्द्वन्द्व मांडतेय. सारख्या विचारमंथनातून शेवटी सगळं द्वंद्व शांत होऊन अमृत निघत अद्वैताचं!

अस वाटतंय आज सकाळ झाली आणि सकाळच्या लक्ख सूर्यप्रकाशात तीच पूर्वीची वाट उजळून निघाली, ती समोरच तर होती, होतं असं कधी कधी!

एकदा पुण्याला प.पू. काकामहाराजांच्या  दर्शनाला पुण्याला जात होते. आपल्या सद्गुरूंच्या दर्शनाला जायचं,खूप महिन्यांनी! त्यातून मी खूप आजारातून .........मृत्यूच्या भयातून पुन्हा या जगात आले होते. मनाची अवस्था, कशी असेल. गाडी मध्ये कुठेतरी केडगाव जवळ ढाब्यावर थांबली, तिथे एफ.एम. रेडिओ चालू होता, गाडीतच सगळी चित्रपट गीते स्पष्ट ऐकू येत होती, पहाटेचे ४ वाजले असतील........गडद अंधार थोड्यावेळाने सगळीकडे एकदम प्रकाश होईल आणि मला गुरुमाउलीचे दर्शन होईल, माझ्या जीवनात पण पुन्हा प्रकाश येईल.

पण तेव्हा चुकून मला ती चित्रपट गाणी आवडली. त्यात काही आवडण्यासारखा नव्हत आणि मनाच्या अवस्थेच्या अगदी  विपरीत ती गाणी होती. पण एकाच स्थितीत राहील तर ते मन कसलं, ते तर निर्विकार परमेश्वर होईल .........मग मला लगेच अनंत प्रश्न सुरु होतात, मला जर चित्रपट आवडत नाही तर, तेव्हा का आवडले, माझं काही चुकलं का ? आत्मपरीक्षण चांगलं पण अतिरेक अगदी वाईट. गाडी आयुष्यभर तीथेच थांबणार नव्हती, अंधार कायम राहणार नव्हता....... आणि मला ही कायम ती गाणी आवडणार  नव्हती.....  कुठेही अडकून पडायचं नाही आणि खरं म्हणजे ते शक्य पण नाही कारण ईश्वर आपल्याला अडकुच देणार नाही.

तसच काहीसं अलीकडे झालं, आणि लिहिण्यातली, स्वभावातली आणि जीवनातलिही लय बिघडली. मला खरच रडू येतंय. ...... पण असं विचार करण्यासारखं यात काहीच नाही. चालायचंच....

आज पुन्हा तुमच्याशी मनापासून संवाद साधताना खूप आनंद होतोय.

वंदना नातूजी नी याब्लॉगच्या  अभिप्रायात सांगितल, की प्रत्येक लेखात अजून लिहावं..... मला खरंच इतका आनंद झाला, वंदनाजी आपल्याला  हे लेखन आवडतंय. पण तेव्हापासून जरा विचारात पडलेय, 'आजचा विचार' हे सदर यासाठीच थोड स्थगित झालं. प्रत्येक विषयावर विस्तृत लिहावं, हे सदर नवीन पद्धतीने कसं आणावं.... याच्या विचारात आहे. काही ना सांगताच हे स्थगित झालं, याबद्दल खरंच क्षमस्व! ( सॉरी!!! ) पण या सगळ्याचं मूळ कारण लय तुटणं.....हेच आहे.

हा लेख परिपूर्ण होण्यास बरेच दिवस वाट पाहिली , लेख आधी झाला  होता, वरील काव्य नंतर हृदयातून उठले... .

Comments

  1. जगण्यासारखीच लिहिताना पण लय सापडण महत्त्वाच असत या तुमच्या मताशी मी सहमत आहे!

    ReplyDelete
  2. धन्यवाद सविता!आनंद झाला, तुमचाही हाच अनुभव आहे मला प्रतिक्रिया लिहायला सुद्धा लय लागते. .

    ReplyDelete

Post a Comment

हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........