क्रांतीचा धगधगता सूर्य - स्वा. सावरकर

अमोलजी देशमुख यांनी स्वा. सावरकरांवर लेख लिहिण्यास प्रेरित केले. बऱ्याच महिन्यांपासून काही अडचणींमुळे तो लेख राहिला होता. तो आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त आपल्यासमोर प्रस्तुत करत आहे. आपल्या प्रोत्साहनाबद्दल अमोलजी हृदयापासून धन्यवाद!


'माझी जन्मठेप' मधून मला शिकायला मिळालेले मुद्दे या लेखात आपल्यासमोर मांडत आहे. आपण कृपया आपले विचार इथे अवश्य व्यक्त करावेत.

मुख्य विचार जो हे दिव्य, अत्यंत दिव्य पुस्तक अगदी वरवर नजरेखालून घालताना मनात आला, तो म्हणजे आज आपले राजकारणी, जनता आपल्यातील बरेचसे, आपण राष्ट्रासंबंधी केवढ्या भयंकर दूरगामी चुका नव्हे अपराध करत आहोत.
1.       राष्ट्रसंरक्षण, आतंकवाद, जातीयवाद, तथाकथित धर्मनिरपेक्षता, दंगे यांसंबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वा. सावरकरांनी त्याच्या कालजयी लेखनातून आणि जीवनातून दिलेली आहेत. तरीही भारतासमोरील या सर्व समस्या दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहेत, याचे कारण या भयंकर समस्यांकडे दूरदृष्टीने, वास्तववादी विचाराने न बघता, बालबुद्धीने बघितले जात आहे. आणि जनतेला ही भ्रमित केले जात आहे.
2.       प्रथम तर या समस्या स्वीकारल्या पाहिजेत, भाबडेपणाने डोळे मिटून सुरक्षेऐवजी धर्मनिरपेक्षता, विकास, भारत – पाक मैत्री अशा अंधश्रद्धांच्या आहारी गेले, तर परिस्थिती अजून गंभीर होत जाईल.
3.       याशिवाय सगळ्यांत महत्वाचा मुद्दा मला शिकायला मिळाला, तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीत संघर्ष सोडायचा नाही. स्वा. सावरकरांनी कधीही हार मानली नाही. निराशेला मनात थारा दिला नाही पण खोट्या आशांनाही बळी पडले नाही.
4.       स्वा. सावरकर म्हणजे सच्चे कर्मयोगी! स्वातंत्र्यपूर्व आणि विभाजनानंतरही संपूर्ण जीवन शांतपणे कर्म करत राहिले. जीवनात हेच तर महत्वाचं आहे. स्वामी विवेकानंदांनी ही हेच सांगितलंय,आपण सर्वोत्तम कामगिरी करू शकतो, आवेश – अभिनिवेशाशिवाय!

स्वा. सावरकरांच्या जीवन आणि कर्तृत्वाचा, व्यक्तित्वाचा हा अभ्यास राष्ट्रहितासाठी आणि वैयक्तिक जीवनात उन्नतीसाठीही अतिशय महत्वाचा आहे.

उगीच हे हिंदुत्ववादी – ते हिंदुत्ववादी म्हणून पूर्वग्रहदुषित दृष्टीने आणि अकारणच द्वेषाने पछाडण्याने भारताची अपरिमित हानी होतेय.

आपण बालबुद्धीचे हे फसवे जीवन सोडून, भारत – पाक मैत्रीच्या खोट्या आशा सोडून आणि भाबड्या धर्मनिरपेक्षतेच्या अंधश्रद्धा सोडून मानवी जीवनाच्या परिपूर्णतेकडे नेणारा स्वा. सावरकरांनी दाखवलेला मार्ग आणि उन्नत अवस्था यावरच आरूढ व्हावे. त्याने राष्ट्रातही, भारतच नव्हे तर विश्वातही शांती आणि व्यक्तिगत जीवनात आनंद व स्थैर्य लाभेल.

असुरक्षित आणि अस्थिर राष्ट्रात विकासाची स्वप्न बघणं आणि त्या नावाखाली स्वत:ची आणि इतरांची फसवणूक करणं, महापाप आहे.

आपण इतके बालिश आहोत का, की खेळ आणि चित्रपट हे आपल्या मनोरंजनासाठी होते हे विसरलो आहोत? आपण आपले तन मन आणि धन ही त्यांना अर्पण केले. खेळ स्वतः खेळले तर खरा आनंद किंवा एका मर्यादेपर्यंत बघितले तरी काही आनंद. पण सारखं त्या खेळाडू आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनाचा रवंथ करत बसणं, आपल्यासारख्या सुज्ञ भारतीयांना शोभत नाही.

आपण भारतीय बुद्धी, संस्कृती, विचार सगळ्यांत सगळ्या जगात प्रबुद्ध आहोत. कुणीतरी परकीयांनी लादलेलं हे लाचार - मनाने पंगु जीवन आपल्याला शोभत नाही. हा सगळं दिव्यं अनुभव स्वातंत्र्यवीरांचे दिव्य जीवन आणि कार्य वाचताना येतो.

वेगवेगळ्या देवीदेवतांच्या जन्मांच्या आणि शक्तींच्या कथा आपण पुराणांत वाचतो. स्वातंत्र्यवीर सावरकर हे असेच दिव्य अवतार एक देवताच आहेत.

पुन्हा शेवटी एक छोटासा, पण महत्त्वाचा मुद्दा! अंधश्रद्धेच्या नावाखाली जे कुतर्क हिंदू किंवा सनातन संस्कृतीबद्दल चालू असतात, त्या दृष्टीने बघितले तर स्वा. सावरकर दिव्य अवतार का आहेत, ह्याचे काहीही उत्तर मिळणार नाही.

आपण सर्व इतिहास एका स्वच्छ आणि निर्मळ दृष्टीने बघितला तर पूर्वी केलेल्या महाभयंकर घोडचुका यापुढे तरी टाळता येतील.


"वंदे मातरम्‌ !"

Comments