विद्या - विवेक तेजोमय विचारयज्ञ

विचारयज्ञात सहभागी झालेल्या सर्व बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दीपावली आपले जीवन प्रेम, ज्ञान व आनंद यांनी आपले जीवन उजळविणारी ठरो …



आज लक्ष्मीपूजन - माता महालक्ष्मीची आराधना उपासना करण्याचा आनंदाचा दिन. आई लक्ष्मी  ही भक्तांना केवळ धन - धान्यच देत नाही तर विवेकपूर्ण विचार आणि विद्या सुद्धा देते.
अष्टलक्ष्मी मध्ये विद्यालक्ष्मी पण आहे. तीन वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी म्हणजे दीपावलीला दिव्य, भक्तिमय, ज्ञानमय आणि राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत असा हा विचारयज्ञ सद्गुरुमहाराजांच्या कृपेने सुरु झाला आणि माता विद्यालक्ष्मी या ब्लॉग रूपाने माझ्या आणि आपल्या सर्वांच्या हृदयी विवेक - विचारांचा दिवा प्रज्वलित करण्यासाठीच जणू अवतरली.

विचारयज्ञ म्हणजे काहीतरी भव्यदिव्य घडवून आणायचे आणि त्यासाठी काहीतरी खूप प्रयत्न वगैरे करायचे असे काही मी ठरविले नव्ह्ते. जसे जसे विचार स्फुरतात तसे लिहायचे, एवढेच. पण आज विचारयज्ञ केवळ ब्लॉग पुरताच मर्यादित न राहता फेसबुक आणि अनेक विचारमंचांतही चर्चांच्या रूपाने, विचारांच्या आदान - प्रदानाने पसरतच आहे. या छोट्याशा प्रयत्नाने, या खूप साध्याशा सुरुवातीने मला एक नवीन विश्वच दिले.

ब्लॉगिंगमुळेच या ऑनलाइन जगतात प्रखर राष्ट्रभक्त भेटले, हिंदुत्ववादी आणि सावरकरवादी भेटले. स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदू महासभा या ऑनलाइन जगातच सापडली.

… आणि जिवाभावाचे मित्रमैत्रिणी, भाऊ - बहिणी भेटले. तुम्ही सगळ्यांनी दिलेले हे अकृत्रिम प्रेम हे केवळ एका ब्लॉगवर किंवा केवळ एका व्यक्तीवर नाही तर, राष्ट्रप्रेमाच्या आणि भारतीय अध्यात्माच्या दीप्तीमान - आपल्या तेजाने समस्त जगतास प्रकाशित करणाऱ्या चिरंतन ज्ञानज्योतीवर आहे.

मला खूप काही लिहिता येत नाही, पण श्रीसद्गुरुमहाराजांच्या अनंत - अखंड कृपेने भारतीय अध्यात्माची आणि अद्वैताची ही दिव्य ज्योत हृदयात प्रकट झाली आणि तोच आनंद - प्रकाश सगळीकडे पसरू लागला. मला तर आतासुद्धा काय लिहावे ते सुचत नव्हते, खूप काही मोठा लेख किंवा कविता तयार नव्हती, पण विचारयज्ञ हे गुरुकृपेचे स्थळच इतके पवित्र आहे की इथे आल्यावर काहीतरी दिव्य असे सुचतेच.

हा विचारयज्ञ असाच सर्व विश्वांत प्रकाशत राहो हीच श्रीसद्गुरुमहाराजांच्या दिव्य चरणकमळी प्रार्थना. गुरुमहाराजांना कोटी कोटी प्रणाम.  आपण सर्व केवळ वाचक नसून चैतन्याचीच विविध रूपे आहत. आपणा सर्वांना माझा अगदी हृदयापासून प्रणाम. बहुतेक नेहमीच माझ्याकडून हेच लिहिले जाते, पण ही केवळ औपचारिकता नाही, मला खरंच आभार मानताच येत नाहीत. मला अगदी मनापासून जे वाटते, ते आपल्याला सांगते एवढेच. आपले अमोलिक प्रेम असेच असू द्या ही प्रार्थना …
       

Comments