स्वामी विवेकानंदासी नमन - शब्दकाव्यपुष्पमाला


स्वामी विवेकानंदांच्या १५१ जयंतीनिमित्त व राष्ट्रीय युवा दिनाच्या विचारयज्ञाच्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा!

हिंदू पंचांगाप्रमाणे स्वामी विवेकानंद जयंती यावर्षी २३ जानेवारीला असेल. स्वामीजींची जयंती १९८५ पासून राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी होते आणि हा दिवस सरकारने ग्रेगोरीअन दिनमानाप्रमाणे स्वामीजींची जयंती ज्या दिवशी तो १२ जानेवारी हा निवडला आहे. त्यामुळे आपण स्वामीजींची जयन्त्ती आज साजरी करीत आहोत.

स्वामी विवेकानंदांना समर्पित एक छोटीशी ‘शब्दकाव्यपुष्पमाला’. हे ‘स्वामी विवेकानंदासी नमन’ त्यांच्या जीवनामृताचे छोटेसे चिंतनरूपी नमन आहे. 

 स्वामी विवेकानंदासी नमन - शब्दकाव्यपुष्पमाला -  

    
स्वार्थ निरत जगा उपदेश देण्या नि:स्वार्थ सेवेचा

मीलन पूर्व – पश्चिमेचे घडविण्या ज्ञानयोगी जन्मला

विवेकसागर ऋषी हा आधुनिक भारताचा

वेचुनि कण अध्यात्माचे अद्वैत प्रसार विश्वी केला

कारण तो तम भेदुनि उदय ज्ञानगभस्ती करण्या

नंदनंदन कृष्ण जणू कलियुगी अवतरला

दायक जो सकल अभीष्ट अद्वैत ज्ञानकुंभाचा

सीतल मधुर ज्ञानप्रकाश याचा तापहीन सूर्यच हा साचा

जाणे जो भेदाभेद अमंगळ विश्वी पसरलेले

ते पंथ भिन्न त्याने अद्वैती एकत्र आणिले

मन स्वामी विवेकानन्दासी आज पूर्ण जाहले

‘वेचुनि कण अध्यात्माचे’- 


स्वामी विवेकानंद ज्ञानाचा शोध घेत होते. त्यावेळी भारतात अनादी काळापासून असलेले अद्वैतज्ञान काहीसे लुप्त झाल्यासारखे झाले होते. ज्ञान कधी नष्ट होत नाही, पण काळाच्या प्रभावाने आवरण आल्यासारखे होते. त्यावेळीही तसेच होते. स्वामीजी त्या ज्ञानाचाच प्रकाश पुन्हा जगात पसरविण्यासाठी आले होते. भगवान रामकृष्ण परमहंस सद्गुरू म्हणून मिळाल्यावर स्वामीजींचा शोध संपला आणि त्यांनी ज्या कार्यासाठी जन्म झाला होता, ते पुढे पूर्ण केले. या संदर्भात वेचुनि कण – लुप्त झालेले ज्ञान मिळविण्यासाठी घेतलेला शोध हा उल्लेख वरील काव्यात आलेला आहे. 

या अनुदिनीवर उजवीकडे लोकप्रिय पोस्ट मध्ये आजही दोन वर्षानंतर जी पोस्ट सर्वाधिक वाचली जात आहे. ती स्वामी विवेकानंदांवरच आहे - स्वामी विवेकानंद -'ज्ञानप्रकाश' , अवश्य वाचा. 

Comments

Post a Comment

हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........