...आणि माझा अहं विठुरायाच झाला

त्याला  सावळा विठोबा म्हणा वा मुरलीधर कृष्ण म्हणा, वेड तर तो लावणारच आहे, पण तो खोडकर असा आहे की वेड लावून गायब होतो. मग आम्ही करायचे तरी काय?.....
प्रतिमा: सावळा विठूरायाठरवले होते त्या विठुरायाच्या प्रेमात लीन व्हावे
नको वैकुंठ, नको मुक्ती
त्याच्या सावळ्या मूर्तीतच
आयुष्य मन – प्राण विलीन व्हावे
पण  हे कधी जमलेच नाही..
खूप प्रयत्न केले..
तरीही जमले नाही..
‘जमणार’ कसे?
जमवायला गेले तर  प्रयत्न आला,
प्रयत्न आला तर भाव संपला
'अहं' दृढ होऊन प्रेम ग्रसला
मग करणार काय?
भाव प्रयत्नांनी तयार करता येत नाही...
प्रयत्नांच्याच अहं ने अहं नष्ट होत नाही
आतुन प्रेम फुलले नाही
तर हृदय शांत होत नाही..
रडले, तडफडले
तू मला सोडलेस?
की मीच तुला  विसरले
फसले का मी मोहमायेत 
का तुझ्या प्रेमास मी योग्यच नव्हते?
व्याकूळ हृदय बोलतच राहिले 
रडतच राहिले
प्रेमवेडे अश्रू वाहतच होते 
या दु:खाला काही अंत तरी आहे का?
कृष्णाचे प्रेम मिळण्याची काही आशा तरी आहे का?
जगायचे कशासाठी आणि मरायचे कशासाठी..
मोहाच्या अंधारात श्रमण्यासाठी  
की विरहाच्या पीडेने 
केवळ तडफडण्यासाठी? 
कुठे जाऊ, कुणाला विचारू...
सावळ्या मूर्तीचे वेड लावून तो का लपतो?
एक क्षण आला...
ते वेडे अश्रू गप्प झाले 
शब्द संपले, विचार संपले
विठूच्या आठवणीने प्राण कळवळले
आणि ....
त्याच क्षणी ‘तो’ आला
चमत्कार झाला
तो माझ्यातच विलीन झाला
‘तो’ मीच बनला
सगळी शास्त्र त्याने बदलली
त्याच्या प्रेमाने वेड लावून
तो मीच बनला
आता तो अहंकार कुठे गेला?

तो तर माझा विठुरायाच झाला
तो तर माझा विठुरायाच झाला     भक्तियोग हे  प्रेमाचे सर्वोच्च रूप आहे. समाधीच आहे ती प्रभुप्रेमात ! आणि समाधीत कुठे ध्यान, ध्येय, ध्याता राहते. प्रेमात कुठे प्रियतम अणि प्रेमी, ईश्वर अणि भक्त हा भेद राहतो? पण हे प्रेम प्रयत्नसाध्य नाही. ईश्वराची कृपाच त्यात कारण आहे. प्रेमही तोच करवून घेतो. आपण काही करू शकत नाही. ते प्रेम, ती कृष्णाची जादू टाळून जगूच शकत नाही. आणि जेव्हा आपला अहं म्हणतो की 'मी' प्रेम करणार ....तेव्हा तो गायब! अहंकारानेचे अहंकार मारता येत नाही. खरं म्हणजे अहंकार मारण्याचे काही कारणच नाही आणि ते शक्यही नाही. उलट जितके आपण प्रयत्न करू, तितका तो वाढतोच आणि निराशा पण आणतो. पण प्रेम किती सुंदर आहे पहा, अहं प्रेमात अक्षरशः वितळतो. उरतं फक्त आणि फक्त  प्रेमच. आणि हे सगळं होतंही किती नकळत! 

महायोग साधना ही सर्वोच्च साधना यामुळेच आहे. कारण आपण पहिल्या दिवसापासूनच साधनेला बसताना प्रयत्न सोडून बसतो. अहंकार आपोआपच नष्ट होत जातो. योगमार्गात भक्ती नसतेच असे सहसा समजले जाते. पण मला वाटते जिथे कष्टसाध्य प्रयत्न आहेत तिथे भक्ती नाही. आणि भक्तियोग  किंवा प्रेमयोग हा योगच आहे. सिद्धयोग साधनेने भाव किंवा प्रेम आतुनच जागृत होते. कारण ती कुंडलिनी शक्ति म्हणजे योगेश्वर कृष्णच नाही का? 

विचारयज्ञात अन्य भक्तिमय काव्य: