"केशव मनोहर लेले": मन विषण्ण करणारा अनुभव

गेल्या शनिवारी ‘केशव मनोहर लेले’ नाटक यु ट्यूब वर बघितले. बरीच जुनी-नवी नाटक बघायची राहिली आहेत. जमेल तसे विडीयो वर बघते. कुसुम मनोहर लेले काही वर्षांपूर्वी बघितले होते. खऱ्या घटनेवर हे नाटक आधारलेले आहे आणि नायिका झालेल्या फसवणुकीने भ्रमिष्ट झाली असे वाचले होते. त्यामुळे दुसरा भाग काय असेल याची खूप उत्सुकता मनात होती, पण या शोकांतिकेतून चांगला शेवट निघण्याची अपेक्षा नसल्याने पुढचा भाग बघायची इच्छा बरेच दिवस टाळत होते. अखेरीस केशव मनोहर लेले बघितलेच. या नाटकावर आणि स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर काही विचार.


कुसुम मनोहर लेलेची थोडक्यात कथा:


कुसुम मनोहर लेले हे नाटक पाहिले नसेल अशी व्यक्ती मिळणे कठीण आहे. हे नाटक अप्रतिम अभिनयाने नटलेले, अत्यंत प्रभावी मांडणी और हृदयाचा ठाव घेणारे होते. या लेखातल्या विषयाची पार्श्वभूमी स्पष्ट व्हावी यासाठी कुसुम मनोहर लेले नाटकाची थोडक्यात कथा सांगते. सुजाता देशमुख सुयोग विवाह मंडळात नाव नोंदवते. मनोहर लेले नावाचे गृहस्थ ही इथे नाव नोंदवतात. दोघांची ओळख होते. मनोहर लेले विवाहित असतात. पत्नीने घटस्फोटासाठी कोर्टात केस दाखल केलेली आहे त्यामुळे लवकरच घटस्फोट होणार आहे, असे सांगतात. सुजाता आणि मनोहर यांचा विवाह होतो. विवाहानंतर सुजाताचे नाव कुसुम मनोहर लेले होते. पुढे त्यांना मुलगा होतो. बाळाला सांभाळणारी स्त्री ही वास्तविक कुसुम मनोहर लेले असते. सुजाताचे बाळ कुसुम, मनोहर आणि सुमी-मनोहरांची बहिण, तिघे मिळून हिरावून घेतात आणि सुजाताला घरातून हाकलून देतात. विवाह मंडळाच्या निर्मलाताई आणि त्यांचे पती यासंबंधी काहीही करू शकत नाही. सुजाता मानसिक संतुलन गमावते. ही घटना पुण्यातील सत्य घडलेली आहे असे त्यावेळी चर्चेत होते. आपल्या पत्नीला मूल होणार नसल्याने मनोहर लेलेंनी हा सगळा डाव रचला होता.

केशव मनोहर लेले:


यात कुसुम बरी होऊन बारा बर्षांनी पुन्हा आपल्या मुलाच्या म्हणजे केशवच्या शोधात सुयोग मंडळात पुन्हा येते. निर्मलाताईंचे पती सुजाता व केशव यांची भेट होऊ नये तसेच केशवला या भयंकर घटनेमागचे सत्य, त्याची खरी आई कोण हे कळू नये यासाठी प्रयत्न करतात. शेवटी दोघांची भेट होते पण निर्मलाताईंच्या पतींच्या दबावाला बळी पडून सुजाता केशवला मनोहर लेले आणि कुटुंबाकडे पुन्हा पाठवते.  

   

मन विषण्ण करणारा अनुभव: 

   

दुसरे नाटक जेव्हा रंगमंचावर आले होते त्यानंतर काळ खूप बदललाय. आजच्या स्थितीत हे नाटक पाहताना नाटक पूर्णपणे पुरुष प्रधान संस्कृतीला डोळ्यासमोर ठेऊन बनवलेले आहे असे वाटले. पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेत निर्णय घेणारी व्यक्ती ही पुरुषच हवी, मग पिता असो, पती असो वा भाऊ असो, इतकेच काय पण मानलेले पिता किंवा भाऊ असतील तर तेच निर्णय घेतील. स्त्री कुठल्याही पदावर असो, तिची योग्यता उत्तम असो, निर्णयक्षमता उत्तम असो, काय वाटेल ते होवो पण सगळे निर्णय पुरुषच घेणार. आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती असली तरी इतक्या प्रमाणात स्त्रीचा स्वत:च्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार नाकारणे होत असेल असे वाटत नाही. पण ‘केशव मनोहर लेले’ मात्र फारच वेदनादायक वाटले. खरी घटना अशीच घडली असावी. नाटकातील छोटे छोटे प्रसंग, पात्रांचा अभिनय अतिशय वास्तवतावादी वाटतो. 

सुजाता आपल्या मुलाला केशवला भेटायला पुन्हा सुयोग विवाह मंडळात येते. परंतु सुयोग विवाह मंडळाचे संचालक पती-पत्नी मात्र सुजाताला आवश्यक तो भावनिक आधार देण्याऐवजी पुन्हा त्यांच्या मते जे योग्य वाटेल ते निर्णय घेताना दिसतात. सुजाता जेव्हा लग्नासाठी प्रथम सुयोग मध्ये येते आणि संचालकांना आई वडील मानते त्यावेळी सुद्धा त्यांची खूप मोठी चूक झाली होती. लुकास सारख्या कंपनीत पुण्यात राहणाऱ्या मनोहर लेलेंची खरी माहिती, घेण्यात ते चुकले होते. पहिल्या लग्नात घटस्फोट होत नाही तोपर्यंत लग्न त्यांनी थांबविले नाही, ही सुद्धा चूकच  झाली.

परंतु आता इतके सगळे भोगल्यावर सुजाता मानसिक आजारातून बाहेर येऊन पुन्हा आपला हक्क मिळविण्याचा प्रयत्न करते तेव्हा संचालक तिला भयानक पद्धतीने नाकारतात. तिची बाजू सुद्धा ऐकून घेत नाहीत. बाळ कर्वेंनी अभिनय उत्तम केला आहे. आक्रस्ताळा स्वभाव असलेले संचालक शांत डोक्याने निर्णय घेऊ शकत नाहीत, ही व्यक्तिरेखा अगदी उत्तमच वठवलेली आहे त्यांनी! आपल्या आसपास असे ज्येष्ठ पुरुष आपल्याला दिसतात जे चुकले तरी ठामपणे स्वत: निर्णय घेतात. पण असा स्वभाव असलेल्या व्यक्तिने एका फसलेल्या, अन्याय झालेल्या स्त्रीच्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय घ्यावा हे मनाला स्वीकार होत नाही. सुजाता आता वयाने मोठी असल्याने परिपक्व होती आणि तिचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त तिलाच होता. संचालक आपल्या पत्नीचे म्हणणे पण नीट ऐकून घेताना दिसत नाहीत. वधू-वर सूचक मंडळ चालवणारी पत्नी आहे, ती कर्तृत्ववान असल्याने तिच्या विचारांचा आणि मतांचा आदर अभिप्रेत होता पण जेव्हा आपल्या पतीपुढे आपले म्हणणे मांडायची वेळ येते तेव्हा या बाई हतबल असहाय्य दिसतात.

आपल्या समाजव्यवस्थेत नेहमीच दिसणारे हे प्रसंग आहेत, यात संशय नाही. पण नाटकाने समाजाला परिवर्तनाचा संदेश द्यावा अशी अपेक्षा आपण करू शकतो. ते इथे होताना दिसत नाही. पण हे नाटक वास्तवावरच आधारलेले नाटक दिसतेय.

१२ वर्षे भोगलेल्या भ्रमिष्ट अवस्थेबद्दल काहीच न्याय नाही. आधी सुजाता आणि केशवची भेट संचालक होऊ देत नाहीत आणि शेवटी आपल्या अखंड भाषणाने संचालक सुजाताला त्याग करायला प्रवृत्त करतात. पुन्हा तुझा निर्णय तूच घे हे म्हणायचे. अगदीच एकतर्फी होऊ नये म्हणून फक्त एक – दोन दृश्यांत कुसुम आणि सुमी यांना केशवने घर सोडल्याचा मानसिक ताण झाल्याचे दाखवले आहे.

हे प्रकरण पुन्हा निघू नये म्हणून संचालक सरळ मनोहर लेलेंची, पुरावे असलेली, फाईल जाळतात.
नाटकाच्या शेवटी सुजाता याचना करते की फक्त कधी कधी केशवला भेटू द्या.

सुजाताच्या पुनर्वसनाचे काय? सुजाताच्या उपजीविकेचे काय? हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. सुजातावर इतका भयानक अन्याय झाल्याने तिचे सगळे आयुष्य होरपळून गेले आणि तिला वर्ध्याच्या आश्रमात राहावे लागले पण संचालक

मात्र तिला हिणवतात, काय होईल केशवच्या आयुष्याचे? कुठे नेणार आहेस त्याला? तुझ्या त्या वर्ध्याच्या आश्रमात?” सुजातावर वर्ध्याच्या आश्रमात राहायची वेळ मनोहरनी फसविल्यामुळे आली होती. पण वास्तवात काही न काहीं कारणानी शेवटी स्त्रीनेच त्याग करणे कसे योग्य हे समाज स्त्रीच्या मनावर बिंबवीत असतो. त्यागाने स्त्रीच्या महानेतेचे गोडवे गाणे, तिला महान बनविणे हा अन्याय करण्याचा सगळ्यात सुसंस्कृत मार्ग म्हणता येईल.

याशिवाय, सगळ्यांत खटकणारी गोष्ट म्हणजे मनोहर केशवचे वडील आहेत त्यामुळे केशववर त्यांचाच अधिकार आहे, असे उल्लेख. पितृसत्ताक मानसिकतेचे द्योतक हे उल्लेख फारच वेदनादायी आहेत.

खूप अवास्तव वाटेल पण असा शेवट मला योग्य वाटला असता, आपण वास्तविक आयुष्यात तरी आजच्या काळात सुजातासारख्या पीडित महिलांना न्याय मिळण्यासाठी या पर्यायांचा विचार करू शकतो.  

मनोहर लेले मुलाच्या शिक्षणाचा सगळा खर्च घेतात. आर्थिक भरपाई सुजाताला देतात, आणि सुजाता व केशव सुखाने राहतात. कुसुमने स्वत: स्त्री असून एका स्त्रीचे आयुष्य आई होण्यासाठी उध्वस्त करण्याला हातभार लावला त्यामुळे तिच्या दु:खापेक्षा कुसुमला न्याय मिळणे महत्वाचे होते. याशिवाय कुसुम, मनोहर आणि सुमी सगळ्यांनीच अपराध केला होता, त्याची त्यांना कायद्याने शिक्षा व्हावयास हवी होती. पण मुळात हे सगळे अवास्तव आहे. असे होण्याची शक्यता नाही.
लेले कुटुंबीय प्रतिष्ठित आहे. 

प्रतिष्ठितांचे अपराध झाकायचे, ते पोलिसांत जायला नको, कोर्ट कचेऱ्या व्हायला नको अशी मान्यता असल्याने लेलेंनाही प्रत्यक्ष झळ पोहोचणार नाही, याची काळजी या नाटकात वास्तवात होते तसेच (किंवा या घटनेत) घेतलेली आहे.


सुजाताला आणि केशवला किंवा सगळेच समुपदेशकाकडे जाऊन शेवटचा निर्णय घेताना दाखवता आले असते. पण समुपदेशक म्हणजे पुन्हा केस कोर्टात जाण्याची शक्यता होती. मुळात ही कोर्ट केस दडपण्यात आली हेच अन्याय्य झाले. 

'कुसुम मनोहर लेले' आणि 'केशव मनोहर लेले' दोन्ही नाटके प्रत्येकाने आवर्जून बघावीत, इतक्या वर्षांनंतरही, अशीच आहेत. खऱ्या घटनेतील सुजाताचे पुढे काय झाले आणि अशा अनेक फसविल्या गेलेल्या स्त्रिया कुठल्या तरी आश्रमात राहायला, एकाकी आयुष्य कंठायला भाग पाडल्या जातात, यांमध्ये आपल्या सर्वांचाच प्रत्यक्ष नाहीतरी कुठेतरी अप्रत्यक्ष, स्त्रीच्या त्यागाची महती गाऊन का असेना, पण संबंध येतो हे खूप दु:खदायक आहे. 

हे बदलायला हवे.