मराठीजन्म

आज जागतिक मराठी दिन. 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी'...खरंच आपले किती भाग्य की मराठी आपली मातृभाषा आहे.

संत ज्ञानेश्वर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, कवि कुसुमाग्रज, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं. वि. जोशी, पु. लं. देशपांडे, बालकवी, बहिणाबाई यांना वाचण्याचे भाग्य आपल्याला लाभले, आपला मराठी भाषिक म्हणून जन्म झाला. 

कालातीत अशी उत्तमोत्तम नाटके, चित्रपट पाहण्याचे भाग्य आपल्याला आपल्या मायमराठीने दिले. 

Image: Greetings of Marathi Language Day


मराठीत लिहिताना एखाद्या शब्दावर लेखणी अडखळल्यावर जाणीव होते की मातृभाषा असूनही आपले मराठीचे ज्ञान किती अपूर्ण आहे. आंतरजालावर मराठी शब्द शोधताना जाणीव होते की डिजिटल जाळ्यावर मराठीचा किती कमी प्रसार झाला आहे. त्यात खूप सकारात्मक आणि आशादायक बाब म्हणजे  आजच्या डिजिटल युगात मराठी प्रेमींनी ब्लॉग, फेसबुक, ट्विटर, विविध संकेतस्थळांवरील चर्चामंच या आधुनिक माध्यमांतूनही मराठी लिहून मातृभाषेची सेवा सुरू ठेवली आहे. हे प्रयत्न कदाचित खूप मोठे वाटत नसले तरी निश्चितंच प्रेरणास्पद आहेत, खऱ्या अर्थाने मराठीचे संरक्षण करण्यास उपकारक आहेत.

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी प्रति प्रेम असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देतानाच मराठीत लिहिण्यास, बोलण्यास प्रेरणा देणाऱ्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय आजचा दिवस साजरा होणार नाही. असेच प्रेरित करीत रहा.