कविता: अत्यवस्थ व्यवस्था

अत्यवस्थ झालेली व्यवस्था, अस्वस्थ झालेली जनता आणि जगभरातच अव्यवस्था पसरविण्याचा एक समान उन्मादी प्रवाह दिसतो त्यावर आजची कविता, 'अत्यवस्थ व्यवस्था'

राजकीय गोंधळ सुरुच आहे... 
मुद्दाम निर्मिलेला, 
ठरवून घडविलेला 
पद्धतशीर रचलेला
राजकीय गोंधळ सुरुच आहे... 

निवडणुका बदल घडवून आणतात
जनता सत्तापरिवर्तन घडवून आणते
राजकीय बदल 
गरजेचा झालेला 
महागाईने त्रस्त, भ्रष्टाचाराने परास्त 
जनता बदल घडवून आणते

Text Image for Marathi Poem Atyavastha Vyavastha

एकच आशा मनात ठेवून
आता सगळं बदलेल
आता आपली दुःख दूर होतील

आणि

आशा पोकळ आशाच राहते
नावं बदलतात फक्त; व्यवस्था मात्र नाही 

हो, आणि माणसंही बदलतातच
निवडणुकांआधीची माणसं 

ती मोठी मोठी भाषणं देणारी,
ती राष्ट्रभक्त माणसं
देशासाठी हो हो फक्त देशासाठीच
सत्ता सांभाळणारी माणसं
सत्ता मिळाली की बदलतात

अंधारात दिवा पेटवायला निघालेली माणसं
दिवा तसाच नं पेटता ठेवून अंधाराला दोष देत बसतात
आधीच्याच अंधारात विचारधारा 
अधिकच धूसर, अंधुक होऊ लागतात

अंधार कितीही वाढो
कालचा असो वा आजचा 
त्यांचा असो वा यांचा 
अंधार कितीही वाढो
पण मतांची आकडेमोड मात्र
सुरूच राहते

विचारधारा फोल ठरतात
अपयशी होतात
पण अंध अनुयायांना अपयश नाही
ते रेटतात अंधार तसाच पुढे
परिणाम म्हणजे फक्त निवडणूक, मतं आणि सत्ता एवढंच...
बदलत राहतं 
व्यवस्था तशीच 

जनता, समाज, विकास, देश, साथ
भाषणासाठी उपयोगी शब्द फक्त
टाळ्या मिळतात ना चांगल्या

आणि त्या महान नेत्यांनी घडवलेल्या, वाढवलेल्या विचारधारा?
त्या कुठे आहेत आज?
विचारधारा......... 
विचारधारा म्हणजे नुसतं खेळणं
राजकीय फायद्यासाठी
सत्तेच्या खेळासाठी
शब्दांचं एक बाहुलं 

खेळता खेळता या विचारधारा
आपला मार्ग वळतात, दिशा बदलतात
आणि रंगसुद्धा
केशरी, भगवा, हिरवा, निळा, पांढरा 
आणि काळासुद्धा

नेत्यांकडे मुखवटे असतात सोयीचे
प्रत्येक विचारधारेसाठी सोयीचे
बस हवा तो मुखवटा घालायचा 
मतांच्या गणिताचा फायदा मिळवण्यासाठी

राजकीय गोंधळ सुरूच होता....
राजकीय गोंधळ सुरूच आहे.... 

"अव्यवस्था आणि अस्वस्थता 
धुमसू दे चांगली 
जळू दे देश" 
मुखवट्यामागचा चेहरा हसतो 
"मतांचा आकडा वाढतो आहे", 
मुखवटा खाली ठेवून तो म्हणतो

आणि पत्रकारिता?
पत्रकारिता, व्यस्त
भ्रमांचे जाळे विणण्यात 
गोड गोड आभासांचे भ्रम 
नसलेल्या सत्याचे भ्रम 
झाकण्यासाठी सत्याचे वास्तव 

आधीच द्वेषाच्या भडकलेल्या आगीत 
सोयीस्कर भ्रमांचे तेल ओतून 

भ्रमांची आणि आभासांचीच रणनीती 
योजनाबद्ध 
सुंदर शब्दांत रचलेली  
सत्याला स्वतःच्या जाळ्यात गुरफटून 
गुदमरून मारणारी 

वेगाने कमजोर होत चाललेली 
विचारशक्ती नष्ट करण्यासाठी 
सहज साध्या जीवनाचे सहज साधे विश्वास नष्ट करून 
अव्यवस्थेचीच नवी व्यवस्था आणण्यासाठी 

स्वतःचीच राजकीय मते लादायला 
किंवा आपल्या मालकांना निवडणूक जिंकवायला!
पत्रकारिताही एक खेळणं झालंय 
विचार लादण्याच्या अदृश्य लढाईचं 

सोयीस्कर सत्य, 
विचित्र दिशेने वळवलेले सत्य, 
जाणीवपूर्वक भ्रमित करणारे सत्य, 
असंवेदनशील आणि बेजबाबदार, 
कि असंवदेनशील आणि म्हणून बेजबाबदार सत्य?

संदर्भ बदलेले सत्य, 
हव्या त्या रंगांनी आणि छटांनी रंगवलेले सत्य,
मतांच्या मिशनचा आकडा आणण्यासाठी 
विद्वेषाचे विष मनात ओतून 
रचलेले रचलेले सत्य 

आणि आम्ही 
लेखक, कवी.... 
आम्हांला मूक केलंय 
आम्हीच!
आम्हांला मूकच राहायचंय 
त्याचा आम्हांला फायदा नसेलंच तर

राजकीय गोंधळ सुरूच होता... 
राजकीय गोंधळ  सुरूच आहे... 

सगळेच आपण 
अव्यस्थेच्या व्यवस्थेचे एक भाग,
अत्यवस्थ व्यवस्थेचे एक अंग, 
जाणता वा अजाणता पण सक्रिय! 
दोष तरी कुणाला द्यावा?

विचारयज्ञ आता ट्विटर वर: @vicharyadnya

Also published in English: Political Turmoil Continues...

तळटीप: कुठल्याही विशिष्ट व्यवसायावर किंवा वर्गावर टीका करण्याचा उद्देश नाही. वास्तव भयानक आहे आणि आपण सगळे त्यात सक्रिय आहोत हेच दुर्दैव आहे.

निवडक विचारप्रवर्तक पोस्ट्स आपल्याला वाचायला आवडतील: 




विचारयज्ञ वर प्रसिध्द होणाऱ्या कविता लगेच आपल्या इनबॉक्स मध्ये मिळण्यासाठी आजच आपला ई-मेल पत्ता नोंदवा.

Enter your email address:





Comments