मंथन: निस्सीम देविभक्ताने फेमिनिस्ट का असायला हवे?

नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे. या नऊ दिवसांत देवीची नऊ भिन्न रूपांत पूजा केली जाईल.

याच वेळी दुसरे जे परिदृश्य दिसत आहे त्यात सश्रद्ध धार्मिक हिंदू सबरीमला मंदिरांच्या हक्कांसाठी त्यांच्यानुसार 'लढा' देत आहेत. कारण त्यांच्यामते सर्व वयाच्या महिलांचा सबरीमला मंदिर प्रवेश खुला करण्याने जे काही भयंकर परिणाम होऊ शकतात त्यांनी हिंदू धर्मच संकटात आलेला आहे. म्हणजे आपल्या सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी महिलांना सबरीमला मंदिर प्रवेशापासून रोखायला हवे.

याच काळात तिसरे परिदृश्य जे आपल्यासमोर तयार होत आहे त्यात अधिकाधिक महिला त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे भयानक अनुभव धैर्याने समाजासमोर मांडत आहेत. 'मी टू' मोहीम आता जोर धरत आहे.

या तिन्ही परिद्रीश्यांत एक घटक समान आहे आणि त्याच्याभोवतीच हे तीनही विषय फिरत आहेत -- तो म्हणजे 'स्त्रीत्व'.Text image for the article: Nissim Devibhaktaane Feminist Ka Asayla Have?

स्त्रीत्व: पूजा, प्रतिबंध आणि अत्याचार


स्त्रीत्वाच्या एका रूपाची आपण देवी, परमेश्वरी म्हणून आपण पूजा करतो. त्याचवेळी स्त्रीत्वाच्या मानवी रूपाला मात्र आपण आपल्या मंदिरांत प्रवेशापासून प्रतिबंध लावतो तेही त्या स्त्रीत्वामुळेच आणि आपल्या दैनंदिन जीवनात स्त्रीत्वावर अन्याय आणि अत्याचार करतो.

हे सगळे मला समजण्यासाठी अत्यन्त कठीण होत आहे. माझा विचार चुकत असल्यास क्षमा करा. मला प्रश्न पडतो आपण खरे कोण आहोत? जे स्त्रीत्वाची देवी, शक्ती म्हणून उपासना करतात, का जे स्त्रीत्वाला अपवित्र मानून त्याला मंदिरांतून प्रतिबंधित करतात की ते जे त्या स्त्रीत्वाला पुरुषांच्या तुलनेत कमजोर मानून त्यावर अन्याय, अत्याचार करतात?

अजून एक परिदृश्य वर आलेल्या तीनही प्रकारांच्या समांतर तयार होत आहे, फेमिनिज्म आणि फेमिनिस्ट्स यांचा द्वेष करण्याचं.

आपला खरा चेहरा कोणता आहे? देवीप्रति आपली भक्ती किती प्रामाणिक आहे. की ते भक्तीचे फक्त एक ढोंग आहे? स्त्रियांशी आपले वर्तन द्वेषपूर्ण असेल तर देवी आपण केलेल्या पूजेचा स्वीकार करेल का?

मनात अशा प्रकारे स्त्रीत्वाबद्दल द्वेष भरलेला असताना आपण केलेली कुठलीही पूजा, उपासना प्रामाणिक असूच शकत नाही. हा काही धर्म नाही.

आपला स्वार्थ साधण्यासाठी ज्या पद्धती, विधी उपयुक्त असतात अशा सोयीच्या प्रकारांना आपण धर्माचं लेबल चिकटवतो आणि मग त्या स्वतःच निर्माण केलेल्या अन्यायकारक तथाकथित परंपरांच्या रक्षणासाठी आपणच लढा देणार जेणेकरून शोषित, दडपलेले घटक शोषितच राहतील. ज्यांना आपल्या वर्चस्वाखाली दडपून, चिरडून, कमजोर करून ठेवले आहे, या लेखाच्या संदर्भात महिला, त्यांना स्वातंत्य्र दिले तर आपल्या पुरूषी एकाधिकारशाही वर त्यांचे नियंत्रण येईल याची आपल्याला भीती वाटते. त्यामुळे कुणी जरा अन्यायाविरुद्ध बारीकसा आवाज उठवला तर आपला धर्म धोक्यात आल्याचा आपण कांगावा करतो. आपल्याला त्यांना आपल्या नियंत्रणाखालीच ठेवायचे आहे कारण आपल्याला वाटतं त्यांचा जन्म हा अपमान, शोषण आणि अत्याचार यांसाठीच झालेला असतो. ते त्यायोग्यच आहेत. आपल्या मानसिकतेचं हे उघड सत्य आहे.

पण असं असलं तरी आपण स्त्रियांचे रक्षक आहोत असे भासवतो. आपण आपल्या हिंदू संस्कृतीच्या महानतेचे दाखले जगाला देतो एकंच एक संस्कृत पद वारंवार सांगून, "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः" आमची संस्कृति स्त्रियांना पूजणारी आहे.

मग अल्पवयीन मुलींवर बलात्कार, सामूहिक बलात्कार, स्त्रियांवर ऍसिड हल्ले, घरगुती हिंसा, आणि ऑनर-किलिंग या वरून आवश्यक आहे असे भासविणारे मुलींचे खून यांच्या बातम्यांकडे बघूच नका.

आम्हांला फेमीनिज्मची गरज नाही. आमच्या महान संस्कृतीत जन्मलेल्या स्त्रियांना त्याची अजिबात गरज नाही. फेमिनिज्म हा समाजात निर्माण झालेला कर्करोग आहे. असे स्वयंघोषित धर्मरक्षकांना वाटते.

नवरात्रात देवीची भक्ती जागोजागी ओसंडून वाहील. आपण देवीच्या विभिन्न नामांचा जप करू. नवरात्राचे नऊ दिवस अखण्ड दिवा लावण्यापासून तर अगदी रोज उपवास करण्यापर्यंत व्रतांचे पालन होईल. आपण आपल्या महान संस्कृति व प्रथांचे काटेकोर पालन करण्याच्या प्रयत्न करू जे योग्य आहेच पण त्याबरोबरच स्त्रियांबद्दल द्वेषही सुरू असतो हे पाहून आपल्या भक्तिवर प्रश्नचिन्ह लावायला हवे असे वाटते.

नवरात्रात बलात्काराच्या बातम्या वाचायच्याच नाही. आपण स्त्रियांवरचे अत्याचार रोखू शकत नाही पण त्याकडे दुर्लक्ष तर करू शकतोच. पुन्हा संस्कृतीचे गुणगान आहेच.

तुम्ही स्त्रियांचे हक्क नाकारत असाल आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की स्त्रियांनी त्यांचे साधं माणूस म्हणून जगण्याचे हक्क मागितले तर सगळ्या समाजव्यवस्थेला, विशेषतः धर्माला धोका निर्माण होतो तर तुम्ही देवीचे खरे भक्त नाही.

आपल्याला जर असे वाटत असेल कि स्त्रीत्वाचा एखाद्या विशिष्ट मंदिरात प्रवेश झाल्यास पृथ्वीवर प्रलय वगैरे होईल तर आपण आताच देवीची भक्ती करण्याचे ढोंग थांबवावे. कारण एका बाजूला आपल्याला स्त्रीत्वाचा द्वेष वाटतो आणि दुसरीकडे आपण दावा करत असू की आपण स्त्रीत्वाची पूजा करणारे आहोत. तर अशी पूजा म्हणजे निव्वळ पाखंड.

स्त्रियांच्या शबरीमला मंदिर प्रवेशाचा मुद्दा स्रीत्वाशी संबंधित आहे आणि आजच्या लेखात आवश्यक आहे त्यामुळे मूळ विषयाच्या संदर्भात यावर चर्चा करणे क्रमप्राप्त आहे. या मुद्यावर सध्या भावना भडकविण्याचा उद्योग पद्धतशीरपणे होत आहे आणि कदाचित काही काळाने, निवडुकीनंतर त्याची सत्तारूपी फळंपण द्वेषाची आग लावणाऱ्यांना मिळतील. पण तूर्तास राजकीय पक्ष बाजूला ठेवून केवळ धार्मिक मुद्दा म्हणून यावर मी माझं मत मांडत आहे. मत हा अंतिम निर्णय नसतो, तसा तो देण्याचा अधिकार माझ्याकडे नाही आणि स्वयंघोषित धर्माधिकारी बनून धर्माचे दुकानही मला चालवायचे नाही. त्यामुळे माझे मत माझे स्वतंत्र मत आहे त्याच्याशी कुठल्याही राजकीय वा अराजकीय पक्ष वा संस्थेचा सम्बन्ध नाही याची कृपया नोंद घ्यावी. मला धर्माच्या नावाखाली चाललेल्या पाखंडाचा त्रास होतो म्हणून लिहावंसं वाटतं. काही आक्षेपार्ह वा आपल्या भावना दुखावणारं माझ्या लेखात वाटलं तर अज्ञानी समजून क्षमा करा, हेतुतः धर्माविरुद्ध लिहिण्याचं मला काही कारण नाही.

सृजनाची शक्ति अपवित्र का मानली जाते?


रजोधर्म असणाऱ्या वयातील स्त्रियांच्या शबरीमाला मंदिर प्रवेशावर प्रतिबंध योग्य ठरविण्यासाठी जे तर्क दिले जातात त्यातला एक म्हणजे हिंदू धर्माप्रमाणे वेगवेगळ्या देवतांचे नियम भिन्न असतात त्यामुळे आपण त्यांचा आदर केला पाहिजे. त्याचा भेदभावाशी संबंध नाही. सगळ्याच मंदिरांत असे नियम नसतात म्हणजे आम्ही स्त्रियांशी भेदभाव करत नाही. पण माझ्या मते या तर्काने हे सिद्ध होत नाही कि विशिष्ट वयाच्या स्त्रियांना मंदिरात का प्रवेश घेता येणार नाही.

धर्म-धर्म ओरडून जे रजोधर्म असणाऱ्या वयातील स्त्रियांना प्रतिबंध असण्याच्या नियमावर कट्टरपणे बोट ठेवले जात आहे आणि रजोधर्माविषयी आणि अर्थातच स्रीत्वाविषयी जे भीतीचे वातावरण तयार केले जात आहे त्यामागे स्त्रीत्वाचा द्वेष हेच कारण दिसते. धर्माचाच दाखला द्यायचा तर प्रत्येक मंदिरासाठी आणि प्रत्येक देवतेच्या बाबतीत हजारो नियम परंपरेने असतात. हे नियम फक्त स्त्रियांवर निर्बंध लादण्यापुरते नक्कीच नाहीत जसे कि मौंजीबंधनाची आवश्यकता, शिखा राखणे, पुरूषांसाठी आवश्यक आचारधर्मांचं पालन करणे हे धर्माप्रमाणे आवश्यक असले तरी सोयीस्करपणे बदलले व झाकले जातात. आणि ते नियम मोडले तर त्याने धर्माला काही धोका निर्माण होतो, श्रद्धेवर आघात होतो किंवा कसे यावर धर्ममार्तण्डाचे काही मत दिसत नाही.

पुरुषांनी शिखा राखण्याचा नियम कधी संपला हे आठवणे ही कठीण आहे. उपनयन संस्काराचे विवाहसोहळ्यासारख्या जंगी सोहळ्यात कधी रूपांतर झाले हे आपल्याला कळलेही नाही. अशा प्रकारे आपण किती तरी परंपरा नकळत सोडल्या आहेत किंवा सोयीनुसार बदलल्या तरी आहेत. धार्मिक उत्सवांत डीजे च्या दणदणाटाचा आणि धर्माचा काय सम्बन्ध? असे असतानाही अश्लील गीते आणि किळसवाणा धिंगाणा हे उत्सवाचे स्वरूप धर्म या नावाखाली आपण आवश्यक केले देवादिकांसमोरच, मग केवळ स्त्रियांच्या मंदिर प्रवेशाने प्रलय होईल असे वातावरण का केले जात आहे?

मंदिरासाठीचे किती नियम, स्त्रियांच्या वयाच्या बाबतीत जो काटेकोरपणा दाखवला गेला आहे, त्याने पाळले जातात याबद्दल कुणीच शहानिशा करू शकत नाही. सामान्य माणूस मंदिर चालवणाऱ्या अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारू शकत नाही आणि आपल्याला नियमांच्या खरेखोटेपणाची माहिती कधी होत नाही. स्त्रियांच्या मंदिर प्रवेशबंदीचे समर्थन करणारे धार्मिक विद्वान मोठ्या चातुर्याने समजूत घालतात की पुरुषांवरही निर्बंध आहेत काही मंदिरांत. पण ते हे कधी सांगताना दिसत नाहीत कि ते नियम कोणते आहेत आणि त्यांचे पालन होत आहे की नाही.

मला या मुद्याला स्त्री विरुद्ध पुरूष असे करायचे नाही. धर्मरक्षणाच्या नावाखाली हा सगळा गोंधळ धर्मसत्तेवरचे नियंत्रण अबाधित राहावे यासाठी वाटते. महिलांना सरसकट मंदिरात प्रवेश मिळाला तर उद्या मंदिराच्या कामकाजात महिलांना घ्यावं अशी मागणीही समोर येऊ शकते ही भीती यामागे वाटते.

जर स्त्रीभ्रुणहत्या करणाऱ्या जन्मदात्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यासारखा नियम करता आला असता तर धर्मरक्षणाच्या शुद्ध भावनेवर मी विश्वास ठेवलाही असता. ज्या विद्वान पंडितांनी १० ते ५० वयोगटातील स्त्रियांना निर्बंध लावण्याचा नियम  शोधून काढला त्यांच्यासाठी स्त्री भ्रुणहत्या करणारे किंवा बलात्कार करणारे अपराधी शोधून काढण्यासाठी नियम बनविणे अशक्य तर निश्चितच नाही.

स्त्रियांचा रजोधर्म अपवित्र असेल तर आपल्या जन्मास कारण तो रजोधर्म असल्याने आपल्याला स्वतःचा जन्म, अस्तित्वही अपवित्र वाटले पाहिजे. पण वास्तवात पुरूष हे सदासर्वकाळ पवित्रच असतात सगळ्या स्थितीत व स्त्रिया अपवित्र असा भेदभाव करतो. स्त्रीत्वाची धास्ती घेतलेल्या किंवा तसे निदान वातावरण तरी बनविणाऱ्या धार्मिक नेत्यांनी अपवित्र स्त्रियांशिवाय पवित्र संतति जन्माला आणण्याचे नवनवीन मार्ग शोधावे.

देवी-देवता समतेने कार्य करतात मग मानव स्त्री-पुरूष समान अधिकार का आणू शकत नाही?


आपण नवरात्रात देवीची भक्ती करण्यात जो खोटेपणा करतो त्याकडे परत वळू या. आपल्याला जर फेमिनिज्म धोकादायक वाटते आणि स्त्री व पुरूष यांसाठी समान हक्कांची मागणी करण्याने पुरूषांना धोका निर्माण होतो असे मानत असू तर आपण देवीची उपासना करू नये. देवीने अन्याय, अत्याचार करणाऱ्या असुरांचा अंत केला आणि पुरूष देवतांना त्या असुरांपासून वाचवले होते. स्त्री ही आपल्या मान्यतेप्रमाणे कमजोर असते असे असूनही देवीने युद्ध करून असुरांना मारले होते. दुर्गा किंवा काली या देवीरूपांना ते स्त्रीरूप आहे म्हणून युद्ध करण्यापासून प्रतिबंधित केले गेले नव्हते. उलट पुरूष देवतांनी देवीला प्रार्थना केली होती असुरांचा अंत करुन त्यांना वाचविण्यासाठी. त्यामुळे देवीच्या कथांमध्ये जी स्त्री-पुरुष हक्कांची समानता दिसते ती नाकारून कुठली भक्ती आपण करणार आहोत?


फेमिनिज्म बद्दल गैरसमज: 

फेमिनिस्ट व्यक्तींचा खूप द्वेष केला जातो इतका की आज फेमिनिस्ट लोकांपासून पुरूषांना संरक्षणाची गरज आहे असे वातावरण बनविलेले आहे.

कुणी म्हणतं की निवडक फेमिनिज्म आहे त्यामुळे ते प्रामाणिक नाही. दुसऱ्या काही लोकांचे म्हणणे आहे, फेमिनिज्म म्हणजे स्त्रियांनी पुरुषांसारखे बनण्याचा प्रयत्न करणे. बाकी काही लोकांसाठी हा डाव्यांचा मुद्दा आहे त्यामुळे द्वेषास पात्र आहे.

फेमिनिज्म द्वेष्ट्यांची ही मते आहेत, फेमीनिज्म मानणाऱ्यांची नाहीत.

फेमिनिज्म ही स्त्री व पुरूष शारीरिक दृष्टया एकसारखे आहेत किंवा ते तसे असावेत हे सिद्ध करण्याची मोहीम नाही.

फेमिनिज्म म्हणजे पुरुषद्वेष नाही. ही फेमिनिस्ट स्त्रियांबद्दल पसरवलेली एक भ्रामक कल्पना आहे. यामागे गृहीतक हे की फेमिनिस्ट या स्त्रियाच असतात. प्रत्यक्षात फेमिनिस्ट पुरुषही आहेत.


फेमिनिज्मला मराठीत स्त्रीवाद म्हटले जाते. आणि गैरसमजही हा आहे की फेमिनिस्ट स्त्रियांना स्त्री वर्चस्ववाद आणायचा आहे. स्त्रीवर्चस्ववाद हे फेमिनिज्म चे ध्येय नाही. समानता हे आहे.

फेमिनिज्म म्हणजे नक्की काय? 

मरियम-वेब्स्टर शब्दकोशानुसार फेमिनिज्म या संकल्पनेची व्याख्या आहे 

१. सर्व लिंगांसाठी सामाजिक, राजकीय व आर्थिक समानतेचा सिद्धांत 

२. स्त्रियांचे हक्क व हितरक्षणासाठी संघटित कृतीशीलता 

फेमिनिज्म स्त्री व पुरुषांसाठी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अधिकार समान असावेत  यासाठीची चळवळ आहे. आणि दोन्ही वर्गांना समान संधी उपलब्ध व्हाव्या यासाठीचा लढा आहे. स्त्रिया या पुरुषांपेक्षा कमकुवत आहेत असे मानून त्यांचे हक्क नाकारू नयेत. 

थोडक्यात स्त्रियांना मानव म्हणून समान वागणूक मिळावी हे फेमिनिज्म आहे.  

मला ही चळवळ अशी समजते 

१. शिक्षणाचा अधिकार: स्त्रियांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळाले पाहिजे कुठल्याही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अत्याचारापासून सुरक्षित वातावरणात आणि तशा प्रकारच्या कुठल्याही धोक्याशिवाय. 

२. अर्थार्जनासाठी काम करण्याचा अधिकार: पालकांनी आपल्या मुलींना शिक्षण देणे हे त्यांच्यावर केलेले उपकार ठरत नाहीत कारण तो त्यांचा हक्क आहे. शिक्षणानंतर आपला व्यवसाय वा नोकरी  निवडण्याचा आणि ती करण्याचा अधिकार. नोकरी करू द्यावी की नाही यावर आजही वाद होतात तसेच लग्नानंतर नोकरीची परवानगी द्यावी कि नाही हाही चर्चेचा मुद्दा असतो. यात मुलीला निर्णयाचे स्वातंत्रय बहुतेक नसतेच. पण नोकरी-व्यवसाय करणे आणि आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होणे हा मुलींचा अधिकार आहे. आजही स्त्री, मुलगी, पत्नी यांच्यामागे नियंत्रक पुरूष असावा अशी मानसिकता दिसते. 

३. याचाच पुढचा मुद्दा सुरक्षित वातावरणात काम करता यावे. भेदभावविरहित, अत्याचार वा शारीरिक-मानसिक छळापासून मुक्त वातावरणात काम करता यावे. 

अशा प्राथमिक मानवाधिकारांची मागणी करणं पुरुषांना धोका कसे ठरू शकेल? सुरक्षित वातावरणाची मागणी करण्याने पुरूषांवर अन्याय होत नाही. मग तसे का पसरविले जाते?

कामाचा मोबदला समान मिळावा या मागणीने पुरुषांच्या कुठल्या हक्कांवर गदा येते? तसे का पसरविले जात आहे? 

पुरुषांनाही लैंगिक छळवणूक किंवा भेदभावांना सामोरे जावे लागते हे मी नाकारत नाही. पुरुषांच्या हक्कांचा आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचा विचार निश्चितच व्हायला हवा. पण महिलांना त्यांचे हक्क शतकानुशतके नाकारले गेले आहेत, त्यांचे दमन आजचे नाही. 

अधिकारांच्या पदांवर स्त्रियांचे प्रतिनिधित्व आजही खूप कमी आहे पण त्यातुलनेत लैंगिक अत्याचारांचे प्रमाण मात्र खूप जास्त आहे. पुरूषांच्या हक्कसंरक्षणासाठी लढणाऱ्यांनी व फेमिनिज्म हा कॅन्सर आहे असे मानणाऱ्यांनी वरील तथ्याला समजून घ्यावे. 

आई जगदंबेची अर्चना फेमिनिस्ट होऊन करा:


स्त्री-पुरूष समान हक्कांच्या चळवळीत सहभागी व्हा. फेमिनिज्मचा द्वेष करू नका. फेमिनिस्ट व्हा. समान हक्कांचे समर्थन करणाऱ्या पुरूषांनी आपण फेमिनिस्ट असल्याचे जगाला अभिमानाने सांगितले पाहिजे. आणि तुम्ही जर फेमिनिस्ट पुरूष असाल तर या चळवळीच्या फक्त वैचारिक अभिव्यक्तिपर्यंत सीमित राहू नका. समानतेसाठी, महिला हक्कांसाठी सक्रियपणे तुमच्या क्षमतेनुसार लढा. त्याने फेमिनिज्म ही पुरुषांविरुद्ध मोहीम आहे हा भ्रम दूर व्हायला महत्वपूर्ण मदत होईल. 

या नवरात्रोत्सवात जेव्हा तुम्ही पारंपरिक विधींनी देवीची पूजा कराल, तेव्हा फेमिनिज्म व फेमिनिस्टांचा द्वेष न करण्याचा निश्चय करा. महिलांचे हक्क समजून घेऊन महिलांचा व  त्यांच्या हक्कांचा आदर करण्याचा निश्चय करा. समान अधिकारांचे समर्थन करा. महिलांनी तर सर्वप्रथम आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या फेमिनिस्ट व्यक्तींना नकारात्मक भावनेने बघणे थांबवले पाहिजे. जेव्हा तुम्ही असा निश्चय कराल आणि त्याप्रमाणे कृती कराल आई जगदंबा तुम्ही केलेल्या तिच्या पूजेचा खऱ्या अर्थाने स्वीकार करेल.

ट्विटर: @Vicharyadnya

In English: Why You Should Be A Feminist For Genuine Worship of Devi Maa
In Hindi: मंथन: देवी मां के भक्तों ने फेमिनिस्ट क्यों होना चाहिए।

नवरात्र विशेष स्तोत्र:

विचारयज्ञमध्ये अन्य विचारप्रवर्तक लेख:विचारयज्ञ वर प्रसिध्द होणाऱ्या कविता/चारोळी लगेच आपल्या इनबॉक्स मध्ये मिळण्यासाठी आजच आपला ई-मेल पत्ता नोंदवा.

Enter your email address:

Comments