Wednesday, February 2, 2011

शपथ घेतो आज हि

परवा म्हणजे ३० जानेवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेप (२ जन्मठेप ) झाल्याची शताब्दी होती, खरं म्हणजे हे लक्षातच नव्हतं, नाहीतर विशेष लेख वा कविता प्रसिद्ध करता आली असती, त्याबद्दल क्षमस्व! खरं म्हणजे कुणाची क्षमा मागणार? आपण एवढा मोठा दिवस विसरलो, देशासाठी सर्वस्व सहज आनंदाने एखादे फुल अर्पण करावे तसे ज्यांनी केले, त्यांच्याबद्दल एवढी तरी कृतज्ञता हवी. हि कृतज्ञता श्री. अमोल देशमुख यांनी मीमराठी ( http://www.mimarathi.net/स्वा. सावरकरांच्या जन्मठेपेची शताब्दी वर अभिव्यक्त केली. त्यावर प्रतिसादहि सुंदर आले.कोण देशभक्त स्वा. सावरकरांचा विरोध करेल! याचाच उलटा अर्थ स्वा. सावरकरांचा विरोध व द्वेष करणारा हा देशभक्त तर सोडाच पण देशद्रोही आहे. अरे म्हणजे यांची निष्ठा कुठे दुसरीकडे तर नाही ना ? काय आपण सुजाण नागरिक आहोत, त्यामुळे अजून काय बोलणार?

असो. या प्रतिसादांमध्ये श्री. गब्बर सिंगांचा (ते हेच नाव मिम वर लिहितात ) प्रतिसाद वाचून..त्यापासून प्रेरणा मिळून हि कविता सुचली .....

तो प्रतिसाद - आपल्या स्वातंत्र्यासाठी ... त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या. We literally owe our liberty to them ...

स्वातंत्र्यसूर्य सावरकर ... तू सूर्याचे तेज उदधिचे गांभिर्यही तूची ...
आणि मला स्फुरलेली कविता अशी ..
स्वातंत्र्यवीर सावरकराना करोडो करोडो वंदन !

अशीच द्या स्फूर्ती आम्हा,
गतवैभव राष्ट्राचे पुन्हा आणण्या,
जीवन आपुले सूर्य आम्हा,
प्रकाश देते पुन्हा लढण्या,
हरलेलो जरी आज दिसतो,
उठू पुन्हा तव प्रेरणेने
जीवन अर्पू मातेस या
केवळ तव आशीशाने 
केवळ तव आशिशाने
वैभव उजळू पुन्हा देशाचे
शपथ घेतो आज हि
तव विचार हे अमृत मम
त्याबळे पूर्ण करू ती

त्याबळे पूर्ण करू ती
पुन्हा पुन्हा आशिष मागतो 
विजयटिळक व्हावा आता 
शत्रूंचा साऱ्या राष्ट्राच्या 
नि:शेष व्हावा आता पुन्हा 
अशेष भारत शांत व्हावा 
वैभवाने फुलून यावा 
वैभव दिसो पुन्हा मातेचे 
वैभव सनातन संस्कृतीचे 
दिव्यं रूप ते सीतेचे 
वैभव मर्यादापुरुषोत्तमाचे 
आशिष घे हा ईश्वराचा 
तुजवरी सदा जो वर्षतो आहे 
राष्ट्रकार्य करण्या प्रेरणा 
बनुनी वाहतो आहे 
शब्दवैभव अमिट हे 
पसरू दे तिन्ही लोकी 
यश हे वर्तविणार या जगी 
सदा केवळ मानवतेचे 
भुलली जनता ज्या भ्रमाला 
जाळे ते तू तोडूनी दे 
विच्छेद कर संशयाचा साऱ्या 
प्रकाश ज्ञानाचा पसरू दे 
भिऊ नकोस नकोस थांबू 
नकोस रडू खोट्या भयाने 
जग हे आहे सत्यासाठी 
त्यास जाणुनी अभय आता 
जगी पुन्हा पसरू दे 
विचार नको, नको ते संशय 
मागे नेती यशास जे 
शांत हृदय - दृढ निश्चयाने
कालचक्र आता फिरवायचे 
कालचक्र आता फिरवायचे .......  


लिहिता लिहिता हा एक संवादच झाला, ईश्वराचा आणि माझा, स्वा. सावरकरांचा आणि माझा किंवा सद्गुरूंचा (प. पू. नारायणकाका महाराज )आणि माझा! इथे माझा, म्हणजे 'मी' जो अनेक संशयांनी ग्रस्त असतो , राष्ट्रसेवा करण्याची इच्छा असूनही उगाच पाय मागे घेतो, अध्यात्मातही उगाच भितो, उगीचच घाबरतो आणि उगीचच भ्रमाला भुलतो..तो 'मी'.......आपल्या सगळ्यांचा 'मी' असाच कधी कधी किंवा बऱ्याचदा त्रास देतो ना...बघा ..त्याला आज उत्तर मिळालं आहे ..ते पण छानसं ! आता मागे फिरायचं नाही, जो सद्निश्चय राष्ट्रासाठी केलाय, समाजासाठी केलाय, तो योग्य मार्गाने निर्भयपणे पूर्ण करायचाच......ईश्वराचे आणि स्वा. सावरकरांचे आशिष आहेत.श्री. गब्बर सिगांच्या ओळी वाचून प्रेरणा मिळाली. धन्यवाद श्री. गब्बरजी ! धन्यवाद श्री. अमोलजी ! श्री. अमोलजींचे अजून एक प्रेरणास्पद वाक्य इथे देते...ज्याने हि कविता लिहिताना प्रेरणा मिळाली -
"कशाचाही आधार घ्या पण देशविघातक शक्तींचा नि:पात करा....."


श्री. रणजितजींचा support आणि प्रोत्साहन तर आहेच.....