Sunday, November 28, 2010

आजचा विचार ( १८ )

काळजी कधीही करू नका. कारण ईश्वर काळजी करत पण असतो आणि आपली काळजी घेतही असतो.

Saturday, November 27, 2010

उचल ते गांडीव

विजेच्या लपंडावामुळे हा लेख आपल्या पर्यंत पोहोचायला २७ / ११ ची रात्र झाली त्याबद्दल क्षमस्व!

२६/११ ला  दोन वर्षांपूर्वी मुंबईवर झालेला महाभयंकर दहशतवादी हल्ला!

काही प्रश्न अस्वस्थ करून सोडतात. कुठे उत्तर मिळेल? का उत्तर मलाच गवसेल?

राष्ट्राशी संबंधित, महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करायची म्हटली तर हा हिंदुत्वाचा मुद्दा, तो हिंदुत्वाचा मुद्दा, देशाला आता विकास हवाय! अशी ओरड ऐकू येते. हल्ला झाला तेव्हा विकासच तर चालू होता. म्हणजे सुरक्षा नसली तरी चालेल?

लोकांना इतकं स्वातंत्र्य आधीच मिळालंय, की स्वतंत्र देश झाले. तरीही या देशावर दडपशाहीचा आरोप लावला जातोय. का? अजून काय हवंय ?

अजून दहशतवाद कशासाठी?

कुणापासून स्वातंत्र्य हवंय?  कुणाला? या देशाच्या अधिकृत नागरिकांनीच हा देश सोडावा म्हणून का ? काश्मीरमध्ये काय झालं? आपल्याला माहीतच आहे.

श्रीमद्भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी का सांगितली, ती पार्श्वभूमी आजही लागू आहे. असे कितीतरी अर्जुन शस्त्र टाकून बसले आहेत, ज्यांनी देशासाठी लढायला हवं आहे. न्यायव्यवस्था तोडण्याची आवश्यकता मुळीच नाही. सत्य, स्व -धर्म पालन , निष्ठा, धैर्य ही सगळी शस्त्रेच नाही का?

आपल्यातला अर्जुन जागृत व्हावा आणि त्याने देशासाठी आणि सुरक्षेसाठी लढावं, यास्तव गीतेचाच संदेश, खालील भावकाव्यात ,
उचल ते गांडीव 
आणि
उभा रहा युद्धास

आज्ञा देतो मी तुज
मार
त्या अधर्मियांस

धर्मरक्षण कर्तव्य तुझे
विचार करीत बसणे नाही

ईश्वरे नेमिले तुज
कार्यासी या सदा

कर्तव्य सोडूनी जगता
कलंक येई कीर्तीस तुझ्या

मज जे ज्ञान सांगे तू
अज्ञान ते सत्य आहे

आता कर तेची जे
ज्ञान सनातन सत्य आहे

क्षत्रियांस ना शिष्य - गुरु
क्षत्रियांस ना पुत्र - पिता

युद्ध हे कर्तव्य क्षत्रियांचे
स्मरण कर सत्यास या

विसरलास का धर्म  तुझा
विसरलास का जन्म तुझा

अमानुष ती कर्मे तुझी
विसरलास का सांग मला

बोलणे तुझे मूर्खपणाचे
वीरांस त्या शोभत नाही

क्यैब्य कवटाळून बसणे
वीरांस त्या उचित नाही
जीवनास तुझ्या शोभत नाही

ऊठ ऊठ अतिशीघ्र ऊठ
व्यर्थ वेळ दवडू नको

कर्तव्य तव समोर आहे
दूर त्याहून पळू नको

पुन: पुन्हा हे वचन माझे
विजय युद्धी तुझाच आहे

अधर्माने हे मृत आधीच
समाप्त करणे आता काम तुझे

अविचल ठाम ध्येयावरी राही
चंचलता तुज शोभत नाही

उपदेश माझा ऐक आता
संन्यास नव्हे कर्तव्य तुझे

मिथ्या हे ज्ञान तुझे
उपजले जे मोहाने

सत्य आहे एकच सदा
युद्ध अधर्माशी आता

बघ त्या दीन जनांकडे
जे वाट तव बघत आहेत

त्यांसाठीच जगणे केवळ
कर्तव्य सत्य तुझे


हा लेख राष्ट्रभाषेत चैतन्यपुजा या माझ्या हिंदी ब्लॉग वर बघावा.

भगवद्गीतेतील अमृत नारायणकृपा वर : 

गीता जयन्ति निमित्त भगवद्गीतेत वर्णिलेला कर्मयोग मला समजला तसा :

Inspiration from Bhagwadgeeta


आजचा विचार ( १७ )

ज्यांचे जीवन नजरकैदेत जाते, कुठल्यातरी कारणाने , कुणाच्या तरी इच्छेने! ते कसे असेल? त्यांचे अबोल अश्रू  डोळ्यांतून बाहेर सुद्धा येत नाहीत. ते निरपराध असतात, ते कदाचित खूप महान होऊ शकतात, पण कोणाला त्यांच्याबद्दल कळूच दिले जात नाही. ते स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक असू शकतात, पण त्यांच्याबद्दल जगाला कळले तर! आपल्याला जर अशा एखाद्या व्यक्तीला, जर काही मदत करता आली तर जरूर करू या!

Friday, November 26, 2010

आजचा विचार ( १६ )

चुकता चुकता पुढे जायचे 
संघर्षात विजयी व्हायचे 

Thursday, November 25, 2010

चैतन्याचे पुजारी ( अक्षरपूजा ) भाग १- प्रार्थना

|| श्री श्री गुरवे नमः ||


कृपा प्रार्थिते मी , कृपा प्रार्थिते मी ||
प्रभो तुमची हो कृपा प्रार्थिते मी || १ ||

नव यज्ञ हा चैतन्याचा ,ब्रह्मांडी पसराया ||
प्रभो तुमची हो कृपा प्रार्थिते मी || २ ||

वाट जरी ही विलक्षण, कठीण मात्र मुळी नसे ||
कृपा तुमची जर मज प्राप्त असे || ३ ||

यास्तव पुनः पुनः ,
गुरो तुमची हो कृपा प्रार्थिते मी || ५ ||

मी कोण इथे, ही इच्छा तव आहे ||
प्रभू पूर्ण करण्या सदा साथ आहे || ६ ||

इच्छेनेच चाले विश्व हे त्याच्या ||
कार्य हे होईल इच्छेनेच त्याच्या || ७ || 

यास्तव चिंता मनी ती नसावी ||
कृपा पूर्ण होण्या वाट ती बघावी || ८ || 


अजून आहे  पुढील  भागात 

आजचा विचार ( १५ )

सर्व प्रश्नांवर एकाचा उत्तर -हरिनाम !

Tuesday, November 23, 2010

आजचा विचार ( १४)

ईश्वर म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे ईश्वर!

Monday, November 22, 2010

आजचा विचार ( १३)

आज एक कराल? थोडी सुट्टी घ्यायची,निरर्थक कामांतून आणि व्यर्थ श्रमांतून! आजचा दिवस चित्रपट आणि त्यासंबंधित व्यक्ती, क्रिकेट आणि त्यासंबंधित व्यक्ती यांची चर्चा नाही. चित्र , बातम्या काहीही नाही.बघा! किती मानसिक विश्रांती मिळते आणि किती शांत वेळ मिळतो ते!

त्याऐवजी सुंदर निळ निळ आकाश, हिरवी हिरवी झाडं, रंगीबेरंगी फुलं, पक्षी, मस्त बागडणारी मुलं, सूर्यास्त आणि त्याआधी काही वेळ निसर्गाने किंवा ईश्वराने मुक्तपणे प्रकट केलेले सौंदर्य हे सगळं बघा. नाहीतर थोडा वेळ शांत, स्वस्थ बसा, डोळे मिटून. आपोआप होणारा श्वासोच्छवास बघा.अर्थातच सिद्धायोगचा पूर्वाभ्यास करून बघा.

ह सगळं पटलं की नाही नक्की सांगा!

Sunday, November 21, 2010

सिद्धयोग ( महायोग ) - २

आज देवदीपावली! आजच्या दिवशी माझे सद्गुरुदेव परम पूज्य श्री नारायणकाका ढेकणे महाराज यांना त्यांचे सद्गुरू परमहंस परीव्राजकाचार्य १००८  श्री लोकनाथतीर्थ स्वामीमहाराजांनी शक्तिपात अर्थात सिद्धायोगाची दीक्षा दिली. आणि आज तो सिद्धायोगाचा सूर्य विश्वबंधुत्वाचा प्रकाश आणि आल्हाद सद्गुरुमाउली नारायणकाकांच्या रूपाने सर्व जगास परम शांती प्रदान करतो आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जो 'मार्तंड जे तापहीन' म्हणून वर्णिला आहे, 'असा हा' तापहीन सूर्य उगवता झाला, आजच्याच मंगल, पावन दिवशी! हो! दीक्षा म्हणजे शिष्याचा नवीन जन्मच! म्हणून तर आपण सद्गुरूंना माउली म्हणतो. हे काका महाराजांनी आपल्या सिद्धयोग ( महायोग ) या पुस्तकात म्हटले आहे.

माझ्यासारख्या अनंत शिष्यांना घरबसल्या सिद्धायोगाचे जे अमृत प्राप्त झाले, त्याची सुरुवात एक प्रकारे याच दिवशी झाली.

सिद्धयोग दीक्षा प्राप्त होण्यासाठी काही नियम पालन करण्याची तयारी असावी लागते. इच्छा असूनही काही कारणांनी लोक दीक्षा घेत नाही. त्या सर्वांचीही सर्वोच्च दिक्षेसाठी आपोआप तयारी सुरु व्हावी म्हणून काका महाराजांनी सिद्धयोग पूर्वाभासाचा राजमार्ग सर्वांसाठी प्रशस्त केलेला आह. याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही  अगदी हृदयापासून आपणा सर्वांना प्रार्थना आहे.

ह्या विश्वरूपी बागेतली अनंत फुले म्हणजे आपण सगळे! सिद्धयोग, पूर्वाभ्यास आणि Universal Brotherhood Day मुळे आपले आयुष्य असेच उमलते आहे, आनंन्दाने डोलते आहे. दुरवर दृष्टी टाकल्यास ही फुले अनंत होत जातात आणि अधिकच जवळ आलेली दिसत आहेत ते विश्वबंधुत्वामुळे!

सगळे भेदभाव मनातून दूर होऊन सनातन भारताची जगास देणगी असलेली संकल्पना "वसुधैव कुटुंबकम"  सगळं विश्वच आमचं घर, सिद्धयोगामुळे सहज मूर्त  होत आहे. ह्या लेखमालिकेतून यापुढे आपण सिद्धयोग व पूर्वाभ्यास याबद्दल अधिक जाणून घेऊ.


या लेख मालिकेचे आधीचे भाग :


देव दीपावली बद्दल अधिक जाणून घ्यायचेय?

आजचा विचार ( १२ )जगात सगळ्यात सुंदर ईश्वराने बनवलं प्रेम ! आणि ईश्वरालाही सुंदर बनवलं प्रेमाने! सौन्दर्यालाही सुंदर बनवलं प्रेमाने! 

Saturday, November 20, 2010

आजचा विचार ( ११ )

निसर्गाने मला जीवन दिले आणि प्रेमही! मी निसर्गाला काय दिले? मी माझ्या जीवनाचा काही वेळ निसर्गासाठी देईन.

Friday, November 19, 2010

प्रार्थना: मुक्तीसाठी परमेश्वरास प्रार्थना

धर्म काय आणि अधर्म काय ,
सत्य काय आणि असत्य काय,
नीती काय आणि अनीती काय,
भूत, भविष्य, वर्तमान काय,

आजचा विचार ( १० )

धर्मांधता म्हणजे नक्की काय ? तुम्हाला काय वाटतं ?

Thursday, November 18, 2010

आजचा विचार ( ९ )

उद्याचा पूर्ण विचार करूनच आजची कामे करा, म्हणजे पश्चात्तापाची वेळ कधीही येत नाही.

भारतमाता

कर्मभूमी ही ज्ञानभूमी ही ||
पुण्यभूमी ही भारतमाता || १ ||

शक्तीभूमी ही भक्तीभूमी ही ||
प्रेमभूमी ही भारतमाता || २ ||

शस्त्रभूमी ही  शास्त्रभूमी ही   ||
शांतीभूमी ही भारतमाता || ३ ||

मातृभूमी ही  पितृभूमी ही   ||
पुण्यभूमी ही भारतमाता || ४ ||

वीरभूमी ही  शूरभूमी ही  ||
संतभूमी ही भारतमाता || ५ || 

विश्ववंद्य ही विश्वगुरु ही ||
सनातन ही भारतमाता || ६ || 

शान्तिदात्री ही प्रेमदात्री ही ||
ज्ञानदात्री ही भारतमाता || ७ || 

गुरुभूमी ही  शिष्यभूमी ही || 
प्रभूभूमी ही भारतमाता || ८ ||

Wednesday, November 17, 2010

सद्गुरूस्मरण

|| श्री श्री गुरवे नमः ||

या भावकाव्यात श्री सद्गुरूंचे स्मरण करणे नसून श्रीसद्गुरुंच्याच परम कृपेने त्यांचे म्हणजे साक्षात ईश्वराचे स्मरण होणे आहे आणि त्यापुढचे सारे मग अध्यात्म असो वा संसार! सारे ते स्मरण अर्थात ती गुरुकृपाच करते. यातंच श्रीसिद्धयोगाची व परम पूज्य नारायणकाका महाराजांची महति सहज ज्ञात होते, स्पष्ट होते. सद्गुरुरायांची कृपा ही अखंड असल्याने त्यांचे स्मरण व हे काव्यही अनंत आहे.

मोहमाया निरसुनी जाई ||
गुरुरायांचे स्मरण होई || १ ||

पापताप धुवूनी जाई ||
गुरुरायांचे स्मरण होई || २ ||  

दुःख अवघे विनशुनी जाई || 
गुरुरायांचे स्मरण होई || ३ ||

प्रेम प्रेम हृदयी येई ||
गुरुरायांचे स्मरण होई || ४ || 

आनंदमग्न मन हे होई ||
गुरुरायांचे स्मरण होई || ५ ||

विकारांचा नाश होई || 
गुरुरायांचे स्मरण होई || ६ ||

प्रकाश जीवनी भरुनी राही ||
गुरुरायांचे स्मरण होई || ७ ||

गुरुकृपेचे गान होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ८ ||

धन्य धन्य हे जीवन होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ९ ||

सौभाग्याचे भान येई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || १० ||

सद्भाग्याची जाण येई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ११ ||

गुरुकृपा प्राप्त होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || १२ ||

चिदानंदरूप शिवो sहं होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || १३ ||

गुरुकृपेचा अनुभव येई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || १४ ||

वरदान नवे प्राप्त होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || १५ ||

सार्थक जीवनाचे होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || १६ ||

कलिकेचे पुष्प होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || १७ ||

अज्ञानाचे ज्ञान होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || १८ ||

तमनिशेचा सुदिन होई || 
गुरुरायांचे स्मरण होई || १९ ||

नवयशाचा प्रारंभ होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || २० ||

प्राणात मन विलीन होई ||
गुरुरायांचे स्मरण होई || २१ ||

वेडे वेडे हे मन होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || २२ ||

पराभक्तीचा प्रसाद घेई ||
गुरुरायांचे स्मरण होई || २३ ||

अहंकाराचा नाश होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || २४ ||

नम्रतेचा उगम होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || २५ ||

नम्रता हृदयी येई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || २६ ||

योग सारे एक होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || २७ ||

ज्ञानगभस्ती उदय होई || 
गुरुरायांचे स्मरण होई || २८ ||

वियोगाचा योग होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || २९ ||

ताप त्रिविध नष्ट होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ३० ||

संकटांचा नाश होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ३१ ||

कार्य सारे सिद्ध होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ३२ ||

कर्म हर दिव्यं होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ३३ ||

साधुता जीवनी येई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ३४ ||

शुचिता सदा प्राप्त होई || 
गुरुरायांचे स्मरण होई || ३५ ||

आयुरारोग्य प्राप्त होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ३६ ||

सिद्धयोग हा समजुनी येई || 
गुरुरायांचे स्मरण होई || ३७  ||

भवसागर तरुनी जाई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ३८ ||

तत्वबोध हा प्राप्त होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ३९ ||

सर्वस्वाचे रक्षण होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ४० ||

गुरुरायांची भेट होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ४१ ||

गुरुरायांचे स्मरण होई || 
गुरुरायांचे स्मरण होई || ४२ ||

आयुष्याचा वेध येई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ४३ ||

हलके सारे दु:ख होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ४४ ||

मन हे पूर्ण शुद्ध होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ४५ ||

मन हे अमन होई   ||
गुरुरायांचे स्मरण होई || ४६ ||

मन हे पूर्ण अमान होई || 
गुरुरायांचे स्मरण होई || ४७ ||

मन हे पूर्ण नमन होई  ||
गुरुरायांचे स्मरण होई || ४८ ||

गुरुराया सांभाळूनी घेई ||
गुरुरायांचे स्मरण होई || ४९ ||

भाव अभाव एक होई 
गुरुरायांचे स्मरण होई || ५० ||

आनंदाने मन मोहरुनि जाई ||
गुरुरायांचे स्मरण होई || ५१ ||

भेदभाव नष्ट होई ||
गुरुरायांचे स्मरण होई || ५२ ||

अनंत काव्य स्फुरत राही ||
गुरुरायांचे स्मरण होई || ५३ ||

नवभाव हृदयी जन्म घेई ||
गुरुरायांचे स्मरण होई || ५४ ||

अप्राप्त सारे प्राप्त होई ||
गुरुरायांचे स्मरण होई || ५५ ||

चिरसुख ते प्राप्त होई ||
गुरुरायांचे स्मरण होई || ५६ ||

भावभक्तीचा उदय होई ||
गुरुरायांचे स्मरण होई || ५७ ||

सद्गुरुंचे आशीर्वाद ऐसे ||
अक्षर अक्षर सत्य होई ||
गुरुरायांचे स्मरण होई || ५८ ||


आजचा विचार ( ८ )

आज फक्त नामस्मरण!

Tuesday, November 16, 2010

आजचा विचार ( ७ )

आजचा विचार आजच! उद्या नाही !!

Monday, November 15, 2010

आजचा विचार

आजच विचार करा.ध्येयाचा आणि यशाचा !

Sunday, November 14, 2010

आजचा विचार

काय सांगू? विचार खूप झाले. आता हवाय आचार!धर्माचार!

Saturday, November 13, 2010

आजचा विचार

खरं म्हणजे विचार म्हणजे मनाचे खेळ! मनापलीकडे आहे त्याची आई म्हणजे प्राण! गुरुदेवांची प्रवचने पहा! सिद्धायोगाची पूर्ण  माहिती मिळेल. त्यांच्याच अमृतवाणीतून! दुवा हा आहे -http://www.mahayogavideos.org/ 

Friday, November 12, 2010

सद्गुरूवचन

समर्थ सद्गुरू सदा जवळी ||
कार्य साधण्या तत्पर राही || १ ||

दु:ख निरंतर दूर करी || 
संकटाचे हरण करी || २ ||

प्रेमाचे दान देई || 
शांतीचे अन देई || ३ ||

आनंदरूप करुनि ठेवि ||
कार्य हेच सदा करि || ४ ||

यासाठीच सद्गुरू होई || 
दीक्षादान करीत राही || ५ || 

यावीण दुजे कार्य न काही ||
अभय शिष्यास देत राही || ६ ||

समर्थ सद्गुरू सदा जवळी ||
कार्य साधण्या तत्पर राही || 

समर्थ सद्गुरू सदा जवळी ||
समर्थ सद्गुरू सदा जवळी ..........

आजचा विचार

विचार, विचार म्हणजे तरी काय? ज्यांचा आपल्यावर प्रभाव असतो, त्या सगळ्यांच्या विचारांचं आपल्या स्वतंत्र व्यक्तित्वावर आलेलं किंवा आपण स्वेच्छेने लादून घेतेलेलं आवरण!

Thursday, November 11, 2010

गुरुप्रसाद

राम भजावा राम स्मरावा ||
 रामच गावा रामच ध्यावा || १ ||

राम राम करता करता ||
ह्या जीवनाचा अंत व्हावा || २ ||

राम राम हाच माझ्या ||
 जीवनाचा श्वास व्हावा || ३ ||

राम असावा मनी मानसी ||
रामच ह्या जीवनी जीवनी || ४ || 


राम स्मरावा रात्रंदिनी ||
 राम भजावा जगीजनी || ५ ||


राम अंतरी राम बाहेरी ||
राम सावरी रामच तारी || ६ ||


राम सांभाळी घेई काळजी || 
 चिंता वाही निज भक्ताची || ७ ||


त्या रामास अर्पावे जीवन || 
 मग कशास जन्ममरण || ८ || 


त्या रामाचे धरावे चरण ||
 धन्य करावे हे जीवन || ९ ||


त्या रामाचे करावे भजन || 
धन्य करावे हे जीवन || १० ||


त्या रामाचे मग करावे ध्यान ||
 मग त्यासीच व्हावे आपले मिलन || ११ ||       
   

आजचा विचार

रोजच्या धावपळीत विचार करायला वेळ मिळतोच कुठे?

Wednesday, November 10, 2010

मला काय हवंय?आत्मवंचना की आत्मपूजा??

जीवनात सुख-दु:ख सारखे येतंच असतात. पण तो एक आभास असतो. कारण, सुख-दु:ख हे एखाद्या घटनेचे पूर्ण  परिणाम आल्यावरच ठरतात. तेही काही स्थिर नसते. पण हे सगळं सांगणं सोपं आहे. खरंच दु:खी आणि निराश मनाच्या स्थितीत काहीच योग्य विचार सुचत नाही. त्यावेळा बहुतेकदा आपल्याकडून आत्मवंचना होते. स्वतःचीच फसवणूक!

त्यावेळी भेकड आणि आत्मवंचना करणारे मूर्ख रडत बसतात. त्याहून जे मूर्ख असतात, आत्महत्या करण्याचा विचार मनात आणतात आणि संघर्ष करण्यासाठी व विजयी होण्यासाठी ईश्वराने दिलेली शक्ती स्वतःची हत्या करण्यासाठी खर्च करतात त्यांना तर काय म्हणावे ? मूर्ख हा शब्द दुखावणारा वाटतो ना? पण खरच निराश अवस्था म्हणजे मूर्खपणाच आहे.

शक्तीशाली स्वतःचा अधिकार स्वतःच घेतात.

काहीच शक्य नाही. दु:खाचा डोंगर कोसळलाय. सगळे रस्ते बंद झालेय. रडू पण शकत नाही अशी स्थिती आहे.कुणाला सांगु? कुठे जाऊ?  अस वाटतंय? भ्रम आहे तो! निव्वळ भ्रम! आत्मवंचना आहे ती!!

परमेश्वराचे नामस्मरण शक्य नाही? प.पू. गुरुदेव काकामहाराज आपल्याला आवडेल त्या देवाचे नाव घ्यायला सांगतात. खरंच सांगा, इतक कठीण आहे का नामस्मरण? आत्महत्येहून तर खूपच सोपं. सिद्धयोग साधना व पूर्वाभ्यास यासंबंधी आधीच्या लेखात विस्ताराने आलंय. शांत बसून थोडा वेळ स्वतः च्या आपोआप होणाऱ्या श्वासोच्छवासावर मन सोडून देणे. शारीरिक क्रियांना पूर्ण स्वातंत्र्य! हे शक्य नाही का? अतिविचाराने अविचार आणि अविवेक होतो. आणि अगदी काही सुचतच नसेल तर थोड शांत पडून राहणं किंवा विश्रांती घेणं शक्य नाही?

एकच लक्षात ठेवायचं, "सगळं शक्य आहे !" ते सगळं शुभ पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी मी धीर धरेनम ईश्वरावर विश्वास ठेवेन. तो कधी धोका देणारच नाही.
ऑग मांदिनो (Og Mandino The Greatest Salesman In The World ) नि लिहेलेल्या प्रसिद्ध ताडपत्रात एक सुंदर वाक्य आहे " मी नेहमी एक पाउल उचलेन आणि त्यानंतर अजून एक !" पहा कित्ती सोपं आहे.

कारायचं ते इतकंच,
 "एक पाउल ध्येयाच्या दिशेने! "
                               "एक पाउल यशाच्या दिशेने उचला आणि उचलत रहा!"

आजचा विचार

विकास की सुरक्षा राष्ट्राचे प्राधान्य कशाला हवे? जो देश सुरक्षित नसेल, ज्या देशाचे नागरिक जे देशाच्या विकासासाठी झटताय, तेच जर सुरक्षित नसतील तर तो विकास कुणासाठी करायचा ? राष्ट्राच्या शत्रुन्साठी?? 

Tuesday, November 9, 2010

आजचा विचार

दंगे भडकतात किंवा भडकवले जातात? काहीही असले तरी दंग्यामध्ये भरडला जातो तो सामान्य माणूस! त्यावेळी ज्या चित्रपट तारे व तारकांसाठी, ज्या क्रिकेटरांसाठी सामान्य माणसाने आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ दिला, ते त्याच्या मदतीला येत नाही.मग विचार करा! आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ आपण कुणासाठी खर्च करायचा? 

Monday, November 8, 2010

आजचा विचार

नमस्कार! आजचा विचार ह्या सदरात ' एक विचार ' असेल, जो आपल्याला विचार करायला लावेल. आणि विचाराबरोबरच काय कृती करावी याचाही विचार करायला लावेल.......

आजचा विचार या विचार सूची अंतर्गत आपणास हे विचारी विचार मिळतील.

 दंगे भडकतात की भडकवले जातात?

सिद्धयोग (महायोग )१


नमस्कार!यापूर्वी  आपण काव्यरुपाने सिद्धयोगाचे वर्णन पाहिले. आज आपण सिद्धयोगाचे वर्णन विस्ताराने पाहू.

" ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान. " 


भावव्याख्या : वरील ओळी आपल्या सर्वांच्या अगदी परिचयाच्या आहेत. आयुष्यात जे काही घडणार आहे, ते तर ईश्वराच्या इच्छेनेच! मग व्यर्थ चिंता करून काय मिळेल! शरीर आणि मन जळत राहील. म्हणून सदा समाधान बाळगावे. 

पण हे कसे शक्य आहे? मनात जर चिंता, काळजी, नकारात्मक विचार येत असतील तर करणार काय? नाही नियंत्रण होत! नकारात्मक विचार ऊर्जा खातात आणि सकारात्मक सुद्धा!

नामस्मरणाने हे सगळं शांत होतं, असं सारे संत स्वानुभवाने सांगतात. सिद्धायोगाने हे सहज सुलभ झाले आहे, कारण इथे केवळ सद्गुरुकृपाच सगळे करते. काही कारणाने शक्तिपात दीक्षा घेण्याची तयारी होत नसल्यास, तशी तयारी अपोआप व्हावी व सर्वांनाच हा सुंदर अनुभव प्राप्त व्हावा, म्हणून अपार करुणामयी सद्गुरुमाउली परम पूज्य श्री नारायणकाका ढेकणे महाराजांनी सिद्धयोग पूर्वाभ्यासाचा अनमोल खजिनाच सर्वांसाठी मुक्त करून दिलेला आहे.

सिद्धयोग साधनेने आणि त्याच्या पूर्वाभ्यासाने मनाचा हा छळ अगदी सहज आणि तत्काळ शांत होऊ शकतो आणि आनंदाचा खजिनाच, सदा प्रवाहित होणारा झराच  प्राप्त होऊ  शकतो. करायचे काय तर अगदी काहीही नाही. आश्चर्य वाटलं ना! अहो ! ही एक मोठी गम्मतच  आहे, अगदी ( fun ) मजाच आहे. आपोआप होणाऱ्या श्वासोच्वासावर मन अगदी सोडून द्यायचे. मनाला म्हण हवा तेवढा गोंधळ घाल. आम्हाला कसलीही भीती नाही. आमचा श्वास चालूय ना ! मग भीती कसली! आपलं म्हणून काही नियंत्रण ठेवायचच नाही.

नामस्मरणानेही हेच होणार. सतत नाम चालू आहे आणि साधना म्हणजे प्राणसाधना नियमित चालू आहे . मनाच्या सर्व वृत्ती अखंडपणे प्राणात / नामात विलीन होत जातात. मग उदय होतो परमशांतीचा आणि परमानंदाचा!

बस! हे शांतपणे, धीराने होऊ देत जावे, विचार निघून जाऊ द्यावे. कधी कधी त्रास वाटतो, नको हे सगळं! काही उपयोग होत नाही, असंही वाटतं. पण धीर सोडू नये, मनाचेच खेळ ते! घाबरायच काय. सद्गुरूंचे, ईश्वराचे (गुरु म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे गुरु !) वचन आहे सर्वांना " सर्वधर्मान  परित्यज्य मामेकं शरणं व्रज| "  " अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद व्रतं मम| " प्राणात- साधना चालू  असताना आणि इतर वेळी नामात सर्व लीन होऊ देणं , म्हणजेच "सर्व धर्मान परित्यज्य". मनाच्या वृत्तींच्या आहारी जाण,  हेच तर मनाचे धर्म, त्यांच्या आहारी जाऊ नये,  त्यांचा परित्याग सहज झाला, मग तो अभय देणारच. 

सगळ्या संतानी हेच सांगितले आहे. सद्गुरुमाउली नारायण काकांनी वारंवार हाच उपदेश दिला आहे . प्राण हाच देव आणि देव हाच प्राण ! हेच वेगळ्या शब्दात म्हणजे  ' ठेविले अनंते ...' या शब्दांत सांगितले आहे . आपोआप  होणाऱ्या क्रियांना साधने /पूर्वभ्यासा दरम्यान पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. पूर्ण अप्रतिकार! प्राणरूपी, चैतन्यरूपी आईस पूर्ण समर्पण. असा हा अमृताहूनही गोड सोप्पा अभ्यास सगळ्यांनी जरूर करून बघावा, अशी विनंती आहे. या नवरात्रात शक्तिची ही आत्मपूजा सर्वांनी अनुभवावी. सद्गुरुमाउलीने आपल्या सर्वांच्या कल्यानासाठी हे सुन्दर वरदानच दिलेले आहे, त्याचा अनुभव अगदी सगळ्यांनी घ्यावाच.  गुरूदेवांचा महान संकल्पच आहे, " सर्वे पि सिद्धयोग दीक्षिता: भवन्तु | ".

विचार हे कर्मांचे, शुभाशुभ कर्मांचे बीज आहे , त्यात जर ' ठेविले अनंते तैसेची ' राहील तर साधनेशिवाय इतर वेळही कर्मांवर हळूहळू नियंत्रण येईल, आणि ते पण आपोआप होऊ लागतील. मग ' चित्ती समाधान ' आपोआपच राहील.

आधी  आलेल्या प्रश्नांचे हेच उत्तर आहे. सिद्धयोगाच्या पूर्ण माहिती साठी परम पूज्य काकामहाराजांचे ' सिद्धयोग (महायोग )' हे पुस्तक बघावे, तसेच  http://www.mahayoga.org/ या सिद्धायोगाविषयीच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी ही  विनंती.Sunday, November 7, 2010

प.पू.सद्गुरू माऊली नारायण काकांची आरती

प.पू.सद्गुरू माऊली नारायण काकांची आरती
 

विश्वा प्रकाशित करण्या उगवला सद्गुरू सूर्यनारायण 
Posted by Picasa

Saturday, November 6, 2010

सिद्धयोगकाव्य

सिद्धयोग ( महायोग )

कष्टाचा हा मार्ग नसे, आनंदाचा झराच असे |
आपोआप हा वाहणारा, शक्तीचा स्रोत असे || १ ||

शक्ती वसे अंतरी जी, जागृत होई गुरुकृपेने |
सुप्त असता गुप्त भासे, गुरुकृपेने प्रकट दिसे || २ ||

प्राणाधार कुंडलिनी, माता जी जगती वसे |
अंतरी ती आपुल्या वसे, गुरुकृपेने प्रकट दिसे || ३ || 

प्रकट होता तांडव करुनी, कर्माचे डोंगर नाशी |
क्षणात ती भस्म करी, पापांच्या महाराशी || ४ ||

मार्ग हा न इथेच थांबे, शुभकर्मेही जाळत राही |
उरता उरे प्राण केवळ, अद्भुत हा प्रलय जवळ || ५ ||

केवळ दिसे गुरुकृपेने,गुरुकृपेने गुरुकृपेने || 
झरा हा सहजी जवळ, तृप्त त्याने व्हावे केवळ || ६ || 

सिद्ध हा योग हा, गुरुकृपेचा महायोग हा ||
सद्गुरू कृपेचा दिव्य योग हा  || ७ ||

महायोग हा सहजी मिळाला ||
आत्मानंद हृदयी गवसला || ८ ||

जिंकू नका विकारांना, प्राण जिंके सहजी त्यांना ||
मारू नका विचारांना, प्राण घेई सहजी त्यांना || ९ ||

काम सोपे करणे न काही, गुरुकृपेचा अनुभव घेई ||
दु:खाने का रडत राहता, सुखाने का भ्रमत राहता || १० ||

संग घ्या प्राणाचा, अवचित गोड नामाचा |
बघा कुठे तो भ्रम आहे, आनंदची भरला आहे || ११ ||

अखंड संवाद सद्गुरूंशी, मिलाप होई अखंड त्यांशी ||
हवे अजुनी काय तुम्हाला, विचार करुनी सांगा जरा || १२ ||

अद्वैत झरा प्रस्फुटीत होई, कार्य सोपे साधुनी घेई ||
आनंदाचा अनुभव घेई, आनंद आनंद हृदयी घेई || १३ ||

आनंद आनंद, हृदयाचे स्पंदन आनंद ||
आनंद आनंद केवळ आनंद ||
जगती भरला आज आनंद || १४ ||

स्तोत्र हे पठण करता, साधनेत गती येई |
विघ्नांचे साऱ्या निर्दालन होई || १५ || 

आशिष हे नारायणाचे, वचन सर्वां सद्गुरूंचे ||
सदा सदा सदा राही अमिट हे बोल माझे || १६ || 

विश्वास मनी असो द्यावा, अखंड ध्यास हृदयी मिळावा ||
जीवन कृतार्थ मग होई, अंतरी दु:ख मुळी न राही || १७ || 

एकरूपता आज गुरूंशी, अनुभविली सहज साची ||
मी न उरले माझे काही, गुरुकृपा भरुनी राही || १८ ||

विघ्न असो साधनेतील, जीवनातील वा सूक्ष्मातील |
सर्वांचे निर्दालन होईल,त्रुटी कशाची कदा न राहील || १९ ||

भाव हृदयी जरा असावा, अनुभव मग सहजी घ्यावा ||
आता तरी सुटावी चिंता, दु:ख भयाची व्यथा || २० ||

विचारांना जाऊ द्यावे, विकारांना धुवू द्यावे ||
क्रियात शक्तीच्या, काही न करावे ||
आपोआप मग जीवन चालावे, निश्चिंत सदा जीवनी असावे || २१ ||

सिद्धायोगाविषयी अधिक विस्तृत माहिती साठी कृपया सिद्धयोगाचे अधिकृत संकेत स्थळ http://www.mahayoga.org/ इथे  भेट द्यावी.

Friday, November 5, 2010

विचारयज्ञाचा आरम्भ

|| श्री श्री गुरवे नम:||

परम पूज्य सद्गुरुमाऊलि नारायणकाका ढेकणे महाराजांच्या परम पावन आणि विश्वास पावन करणाऱ्या चरणकमली कोटी कोटी साष्टांग प्रणाम! सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

परवा म्हणजे धनत्रयोदशीला हा मराठी ब्लॉग सुरु झाला. झाला म्हणजे मी केला असं म्हणणं चुकीचा ठरेल, कारण जे होतं ते ईश ईछेनेच! सद्गुरूंच्या ईछेनेच! या ब्लॉगवर हृदयातून प्रस्फुटीत झालेले विचार असतील.प. पू. सद्गुरुदेवांनी जवळजवळ दीड वर्षापूर्वीच मला स्फुरलेले लेखन बघून आशीर्वादात्मक आज्ञा दिली होती की तुम्हाला जो आनंद मिळालाय तो इतरानांही द्या. पुन्हा पुन्हा हे लेखन छापायला ही सांगितले.

या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर विचारयज्ञ ह्या ब्लॉगची सुरुवात होत आहे. माझ्या मनातल्या शंका कुशंका नष्ट होऊन आता हे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी हा 'विचारयज्ञ'  सुरु होत आहे.

यज्ञ सकाम, निष्काम असू शकतो. स्व-कामानापूर्तीसाठी किंवा वैश्विक शांती व भरभराटीसाठी असू शकतो.यज्ञात दिल्या जाणाऱ्या आहुती ह्या शुद्ध तुपाच्या पवित्र आहुती असतात. या आहुती नष्ट होत नाही तर पवित्र धुराच्या रूपाने विश्वात पसरतात व योग्य तो अपेक्षित परिणाम साधतात किंवा घडवून आणतात.

तद्वतच हे आपोआप स्फुरलेले विचार नवीन मंथन विश्वात घडवून आणतील. याशिवाय परम प्रेम अर्थात प्रेमभक्ती, निष्ठा, सत्य, तत्वज्ञान यांची वर्षाही करतील व जसे गुरुकृपेने हे हृदय उमलून उठले, तशी हे विचार वाचून सर्वांचीच हृदये उमलावी आणि आनंदाने मोहरून जावी हीच सद्गुरुदेव नारायणकाकांच्या चरणकमली प्रार्थना!